अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लादला आहे, जो बुधवारपासून (२७ ऑगस्ट) लागू झाला. एकूण परिस्थिती बघता, भारत आणि अमेरिका यांच्यात मुक्त व्यापार करार होण्याची शक्यता फारच धूसर आहे. मात्र यातच, माजी परराष्ट्र सचिव आणि राज्यसभा खासदार हर्षवर्धन श्रृंगला यांनी एक आश्चर्यकारक विधान केले आहे. 'भारत आणि अमेरिका लवकरच मुक्त व्यापार करारावर मार्ग काढतील,' असे त्यांनी म्हटले आहे.
हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले, "आपल्याला भारतातून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या वस्तूंवर ५० टक्के कर भरावा लागणार आहे. आम्ही याचा प्रभाव कमी करण्यावर काम करत आहोत. आता पर्यायी बाजारपेठांचाही शोध घेतला जाईल. ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिराती आणि युनायटेड किंग्डमसोबत आपला मुक्त व्यापार करार आहे. आपण युरोपियन युनियनसोबत मुक्त व्यापार कराराच्या अगदी जवळ आहोत. याचाच अर्थ, आम्ही अनेक बाजारपेठांपर्यंत पोहोचू शकतो."
अमेरिकेसोबतच्या मुक्त व्यापार करारासंदर्भात काय म्हटले हर्षवर्धन श्रृंगला? -अमेरिकेसंदर्भात बोलताना श्रृंगला म्हणाले, "या नात्यावर माझा विश्वास आहे.आपले अमेरिकेसोबत सर्वात व्यापक आणि बहुआयामी संबंध आहेत, जे इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत. आशा आहे की आपण लवकरच अमेरिकेसोबत एका समाधानकारक मुक्त व्यापार करारासाठी मार्ग शोधू. जो नक्कीच आपल्याला राष्ट्रपती ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यापर्यंत घेऊन जाईल.
या क्षेत्रांना बसणार सर्वाधिक फटका? -एस अँड पी ग्लोबलच्या अहवालानुसार, भांडवली वस्तू, रसायने, ऑटोमोबाईल्स, अन्न आणि पेय निर्यातीला या कारामुळे अडचणींना सामोरे जावे लागू शकते. याशिवाय असेही काही क्षेत्र आहेत, ज्यांच्यावर या कराचा फारच कमी परिणाम होईल. यामध्ये टेलिकॉम, आयटी, बँका आणि रिअल इस्टेट यांचा समावेश आहे.