काबुल - पश्चिमी बदगीस प्रांतामध्ये तालिबानने एका रात्रीत अनेक सुरक्षा तपासणी चौक्या उडविल्या. या स्फोटांमध्ये अफगाणिस्तान मधील ७ पोलीस कर्मचारी मृत्यूमुखी पडले. अफगाणिस्तानच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.प्रांतीय परिषदेचे एक सदस्य मोहम्मद नसीर यांनी शनिवारी सांगितले की, कदीस जिल्ह्यामध्ये हल्ल्यादरम्यान ३ अन्य सुरक्षा क र्मचारी जखमी झाले. तालिबानने या हल्ल्यांबाबत काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी सांगितले की,अफगाण दलांसोबत समन्वय करुन आघाडी केलेल्या सुरक्षा गटांनी शुक्रवारी रात्री २ वेगवेगळे हवाई हल्ले केले. त्यामध्ये पूर्व कुनार प्रांतामध्ये इस्लामिक स्टेटचे (आयएस)कमीत कमी ४३ अतिरेकी मारले गेले.चापरा जिल्ह्यात हवाई हल्ला करुन ‘आयएस’ला लक्ष्य करण्यात आले. त्यात अनेक पाकिस्तानी आणि उझबेक नागरिक मारले गेले. तालिबान आणि आयएस या अतिरेकी संघटना पूर्व अफगाणिस्तानात, विशेषत: कुनार आणि शेजारील नानगरहार प्रांतात सक्रिय असून ते पाकिस्तान सीमेजवळ आहेत. (वृत्तसंस्था)
तालिबानने केलेल्या हल्ल्यात अफगाणच्या ७ पोलिसांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 03:50 IST