वॉशिंग्टन - डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेचा कारभार हाती घेतल्यापासून अनेक धडाडीच्या निर्णयांचा सपाटा लावला आहे. त्यात नुकतेच अमेरिकेच्या प्रशासन सरकारी दक्षता विभाग (DOGE) ने सरकारी पैसा वाचवण्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळे अमेरिकेचा बराच पैसा वाचणार आहे. बाहेरच्या देशांना दिला जाणारा निधी कपात केल्यामुळे तो पैसा अमेरिकेच्या तिजोरीत जमा होईल. आता या पैशातील २० टक्के अमेरिकेतील लोकांना वाटण्याचा विचार ट्रम्प प्रशासन करत आहे. त्याशिवाय अन्य २० टक्के पैसा सरकारवरील कर्ज कमी करण्यासाठी वापरला जाईल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेच येताच प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क यांच्याकडे DOGE ची जबाबदारी सोपवली होती. सरकारी तिजोरीतून विनाकारण वाया जाणाऱ्या निधीचा आढावा घेऊन हे पैसे वाचवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात होता. इलॉन मस्क यांनीही दिलेली जबाबदारी पार पाडत अनेक देशांना वाटप केल्या जाणाऱ्या निधीला कात्री लावली आहे. त्यामुळे अमेरिकेचा पैसा वाचणार आहे. आता या वाचलेल्या पैशाबाबत आम्ही नवीन संकल्पना आणण्याचा विचार करत आहोत असं ट्रम्प यांनी मियामी इथल्या सॉवरेन वेल्थ फंडद्वारा आयोजित एका बैठकीत बोलून दाखवले.
DOGE यांच्याकडून बचत झालेला २० टक्के पैसा अमेरिकेतील लोकांना दिला जाणार आहे आणि २० टक्के सरकारचं कर्ज फेडण्यासाठी खर्च केला जाईल. सरकारी बचतीचा आकडा अविश्वसनीय आहे कारण हे अब्ज, शेकडो अब्जाची बचत होत आहे. त्यातीलच आम्ही २० टक्के पुन्हा अमेरिकेतील लोकांना देण्याचा विचार करत आहोत असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. हा विचार उद्योजक जेम्स फिशबॅक यांच्याकडून पुढे आला आहे. ज्यांनी मंगळवारी एक्सवर पोस्ट करून ४ पानी आकडेवारी सादर केली ज्यात DOGE लाभाचा प्रस्ताव दिला होता. मस्क यांनीही त्यावर मी राष्ट्राध्यक्षांशी यावर चर्चा करेन असं उत्तर दिले होते.
४०० बिलियन डॉलर लोकांना वाटणार ट्रम्प
फिशबॅकच्या आकडेवारीनुसार, DOGE च्या बचतीपैकी २० टक्के म्हणजे अंदाजे ४०० बिलियन अमेरिकन डॉलर वाटप करण्याचा प्रस्ताव आहे. जुलै २०२६ पर्यंत सर्व करदात्यांना प्रत्येकी ५००० डॉलर (४.३० लाख रुपये) चेकने वाटप केले जाऊ शकते. २ ट्रिलियन अमेरिकन डॉलर बचतीपर्यंत DOGE चा आकडा आहे. २० जानेवारीला ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षाचा पदभार स्वीकारल्यापासून अब्जो डॉलर्सची बचत केली आहे. मस्क यांच्या नेतृत्वात सरकारी निधी वाटपांना कात्री लावली जात आहे. सरकारी नोकरी संपवली, सरकारी संपत्ती विकून टाकली आहे. DOGE च्या या निर्णयामुळे ५५ बिलियन अमेरिकन डॉलरची बचत झाली. आतापर्यंत सरकारी खर्चातून ८.५ बिलियन डॉलरची कपात केली आहे.