इराकमधील एका शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत ५० जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इराकमधील अल-कुट येथील एका सुपरमार्केटमध्ये ही दुर्घटना घडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओमध्ये इमारतीचा मोठ्या भागाला भीषण आग लागल्याचं पाहायला मिळत आहे.
अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. वासित प्रांताचे गव्हर्नर मोहम्मद अल-मियाही यांनी आयएनए वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, एका मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये लागलेल्या आगीत ५० जणांचा मृत्यू झाला आहे. आगीचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आगीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही व्हायरल होत आहेत.
आग एका हायपरमार्केट आणि एका रेस्टॉरंटमध्ये लागली. आग लागली तेव्हा अनेक लोक जेवत होते. तर काही जण खरेदी करत होते. अग्निशमन दलाच्या जवानांना अनेक लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेमुळे देशभरात तीन दिवसांचा शोक जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती वासित प्रांताचे गव्हर्नर मोहम्मद अल-मियाही यांनी दिली.