४० लाख कर्मचाऱ्यांचे संगणक हॅक
By Admin | Updated: June 6, 2015 00:08 IST2015-06-06T00:08:34+5:302015-06-06T00:08:34+5:30
अमेरिकेतील ४० लाख आजी-माजी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संगणकावरील खाजगी माहिती हॅक करण्यात आली

४० लाख कर्मचाऱ्यांचे संगणक हॅक
वॉशिंग्टन : अमेरिकेतील ४० लाख आजी-माजी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संगणकावरील खाजगी माहिती हॅक करण्यात आली असून, या हॅकिंगमागे चिनी नागरिक असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. चीनने हा आरोप फेटाळला आहे.
अमेरिकेच्या संगणक विश्वातील हल्ल्याचा हा सर्वांत ताजा गुन्हा असून, या हॅकिंगचा सर्वाधिक परिणाम सरकारच्या कर्मचारी व्यवस्थापन विभागावर झालेला आहे. या विभागातील संगणकावर कर्मचाऱ्यांचे खाजगी तपशील व सुरक्षाविषयक माहिती होती. अमेरिकेच्या तपास अधिकारी व सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या सायबर हल्ल्यामागे परदेशी संस्था वा सरकार आहे. हल्ल्याशी चिनचा संबंध असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे.
चिनी दूतावासाकडून खंडन
वॉशिंग्टन येथील चिनी दूतावासाने या आरोपांचे खंडन केले असून, अमेरिकेचे हे आरोप बेजबाबदार व खोडसाळपणाचे आहेत, असे म्हटले आहे. परदेशी संस्थांकडून झालेल्या या हॅकिंगचा तपास लावणे अवघड आहे, असेही या चिनी प्रवक्त्याने म्हटले आहे.
कर्मचारी व्यवस्थापन विभागाने आता आपल्या आयटी व्यवस्थेवर तसेच खात्याच्या अंतर्गत माहिती केंद्रावर हल्ला झाला, असे म्हटले आहे. अंतर्गत माहिती केंद्रात कर्मचाऱ्यांची खाजगी माहिती सेव्ह केलेली होती. (वृत्तसंस्था)
एफबीआयचा तपास
४एफबीआयने या सायबर हल्ल्याचा शोध सुरू केला असून, लवकरच जबाबदार गुन्हेगारांना समोर आणू, असे म्हटले आहे. एप्रिल महिन्यात सरकारच्या माहिती यंत्रणेवर असाच हल्ला करण्यात आला. मे महिन्याच्या सुरुवातीस अमेरिकेच्या गृहमंत्रालयाने ४० लाख कर्मचाऱ्यांच्या संगणकावर परिणाम झाला, असे म्हटले होते. मात्र, नक्की कोणती माहिती बाधित झाली हे तेव्हा सांगण्यात आले नव्हते.
४अमेरिकन सरकारने चीनकडून आपल्या गोपनीय माहितीवर हे हल्ले होत असल्याची तक्रार आधीही केली आहे. चीनने ही समस्या दूर करावी, अशी विनंतीही अमेरिकेने या आधी केली होती.
४चिनी दूतावासाचे प्रवक्ते झू हैक्वान यांनी चीनवर केलेला आरोप फेटाळला असून, चीनकडून होणारे सायबर हल्ले रोखण्यासाठी चीन सरकारने बरेच प्रयत्न केले, असे म्हटले आहे. व्हाईट हाऊसने या हल्ल्यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
४२०१४ साली चिनी घुसखोरांनी कर्मचारी व्यवस्थापन विभागावर हल्ला केला होता. त्यावेळी दहा हजार कर्मचाऱ्यांच्या फाईल चोरण्यात आल्या होत्या. या फाईलमध्ये सुरक्षाविषयक आरोपातून मुक्त करण्याची विनंती करण्यात आली होती, असे वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिले आहे.
४कर्मचारी व्यवस्थापन विभागावर या आधीही सायबर हल्ला झाला होता. या विभागात परराष्ट्र खात्याशी संबंधित माहिती संगणकावर असते, तसेच व्हाईट हाऊस व अमेरिकन पोस्टल खाते यांचीही गोपनीय माहिती या विभागातील संगणकावर असते.