इराकमधील ४० भारतीयांची हत्या झालेली नाही - सुषमा स्वराज
By Admin | Updated: November 28, 2014 13:04 IST2014-11-28T12:01:52+5:302014-11-28T13:04:09+5:30
इराकमध्ये अडकलेले ४० भारतीय सुरक्षित असून त्यांची हत्या झालेली नाही असे स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिले आहे.

इराकमधील ४० भारतीयांची हत्या झालेली नाही - सुषमा स्वराज
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - इराकमध्ये अडकलेले ४० भारतीय सुरक्षित असून त्यांची हत्या झालेली नाही असे स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिले आहे. या भारतीयांच्या कुटुंबियांशी परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी संपर्कात असून त्यांना परत आणण्यासाठी तीन अधिकारी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
इराकमध्ये ४० भारतीयांची हत्या झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये येत आहे. राज्यसभेतही या मुद्द्यावरुन विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी या भारतीयांची हत्या झाल्याचे म्हटले असता सुषमा स्वराज यांनी त्या शब्दावर आक्षेप घेतला. हत्या ऐवजी कथीत हत्या म्हणा अशी विनंती स्वराज यांनी सर्व खासदारांनी केली. यानंतर मायावती व अन्य पक्षांच्या खासदारांनी या भारतीयांबद्दल केंद्र सरकारने माहिती द्यावी अशी मागणी केली. यानंतर सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत उत्तर दिले. इराकमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून ४० भारतीय अडकल्याचे वृत्त वारंवार झळकत असल्याचे स्वराज यांनी निदर्शनास आणून दिले. यापैकी हरसिम्रत मिश्र हा भारतीय तिथून पळ काढण्यात यशस्वी झाला आहे. तो सध्या भारत सरकारच्या देखरेखीखाली असल्याचे स्वराज यांनी सांगितले.
भारतीयांची हत्या झाल्याचा दावा करणारे बांग्लादेशी नागरिक आणि मिश्र यांच्या जबाबात तफावत असल्याचे स्वराज यांनी नमूद केले. 'भारतीयांची हत्या झाल्याचे बांग्लादेशी कामगारांनी म्हटले आहे. पण भारतीय व बांग्लादेशी कामगारांना दहशतवाद्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेले होते. म्हणजेच बांग्लादेशी कामगारांनी भारतीयांची हत्या करताना बघितले नाही हे स्पष्ट होते. आम्हाला सहा सूत्रांनी ते भारतीय सुरक्षित असल्याचे सांगितले असून गोपनीयतेचा भंग होऊ नये म्हणूनच आम्ही त्यांची नावे जाहीर करत नाही असे स्वराज यांनी म्हटले आहे.