तुर्कस्थान अंकारामध्ये बॉम्बस्फोट ३४ ठार, १२५ जखमी
By Admin | Updated: March 14, 2016 14:15 IST2016-03-14T07:44:39+5:302016-03-14T14:15:24+5:30
तुर्कस्थानात मध्य अंकारामध्ये रविवारी संध्याकाळी एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वत:ला बॉम्बस्फोटामध्ये उडवून घेतले.

तुर्कस्थान अंकारामध्ये बॉम्बस्फोट ३४ ठार, १२५ जखमी
ऑनलाइन लोकमत
अंकारा, दि. १४ - तुर्कस्थानात मध्य अंकारामध्ये रविवारी संध्याकाळी एका आत्मघातकी हल्लेखोराने स्वत:ला बॉम्बस्फोटामध्ये उडवून घेतले. या स्फोटात ३४ नागरीक ठार झाले तर, १२५ जण जखमी झाले. अलीकडच्या काही महिन्यांमध्ये तुर्कीमध्ये झालेला हा मोठा दहशतवादी हल्ला आहे.
सतत गजबज, वर्दळ असलेल्या किझीले चौकातील बस स्टॉपजवळ हा बॉम्बस्फोट झाला. त्यामुळे मोठया प्रमाणावर जिवीतहानी झाली तसेच काही दुकांनाचेही नुकसान झाले. बसस्टॉपलाच जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याच्या उद्देशाने स्फोटकांनी भरलेली गाडी बसस्टॉपजवळ उडवून देण्यात आली असे अधिका-यांनी सांगितले.
पाच महिन्यात अंकारामध्ये झालेला हा तिसरा हल्ला आहे. या भागात पंतप्रधान कार्यालय, संसद आणि परदेशी दूतावास आहेत. तुर्कीला कुर्दीश बंडखोर आणि इसिसपासून धोका आहे. अमेरिकन दूतावासाने शुक्रवारीच मध्य अंकारामध्ये हल्ला होऊ शकतो त्यामुळे अमेरिकन नागरीकांनी तिथे जाऊ असे आपल्या नागरीकांना आवाहन केले होते.