आत्मघाती हल्ल्यात इराकमध्ये ३२ ठार
By Admin | Updated: January 3, 2017 04:10 IST2017-01-03T04:10:39+5:302017-01-03T04:10:39+5:30
आत्मघाती कारबॉम्ब हल्ल्याने इराकची राजधानी सोमवारी हादरली. यात ३२ लोक ठार, तर अनेक जखमी झाले. मृतांत बहुतांश रोजंदारी मजुरांचा समावेश आहे.

आत्मघाती हल्ल्यात इराकमध्ये ३२ ठार
बगदाद : आत्मघाती कारबॉम्ब हल्ल्याने इराकची राजधानी सोमवारी हादरली. यात ३२ लोक ठार, तर अनेक जखमी झाले. मृतांत बहुतांश रोजंदारी मजुरांचा समावेश आहे. हे लोक सद्र शहराच्या चौकात कामाच्या प्रतीक्षेत उभे असताना त्यांना लक्ष्य करण्यात आले. स्फोटानंतरची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकण्यात आली आहेत. त्यात घटनास्थळावरून काळ्या धुराचे लोट उठत असल्याचे दिसते.
या स्फोटात ३२ ठार, तर ६१ जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. तथापि, यामागे इस्लामिक स्टेटचा हात असण्याची दाट शक्यता आहे. कारण, इस्लामिक स्टेटने यापूर्वी बगदादमध्ये असे अनेक हल्ले घडवून आणले आहेत. गेल्या तीन दिवसांत बगदाद शहरात झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. शनिवारी मध्य बगदादमधील एका गजबजलेल्या बाजाराला लक्ष्य करून दुहेरी बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. यात २७ लोक ठार झाले होते.