२६/११चा हल्ला शौर्यपूर्ण - लादेनच्या कागदपत्रांत उल्लेख
By Admin | Updated: May 21, 2015 15:12 IST2015-05-21T10:43:06+5:302015-05-21T15:12:04+5:30
भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर २६/११ रोजी झालेला हल्ला हा अतिशय शौर्यपूर्ण होता, असा उल्लेख अल-कायदाच्या पत्रात करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

२६/११चा हल्ला शौर्यपूर्ण - लादेनच्या कागदपत्रांत उल्लेख
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर २६/११ रोजी झालेला हल्ला हा अतिशय शौर्यपूर्ण होता, असा उल्लेख अल-कायदा या दहशवादी संघटनेच्या पत्रात करण्यात आल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये ओसामा बिन लादेनची हत्या केल्यानंतर अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने तेथून हस्तगत केलेली कागदपत्रे प्रसिद्ध करण्यात आली असून त्यातून ही माहिती समोर आली आहे.
' २६/११चा हल्ला शौर्यपूर्ण तर पुण्यातील जर्मन बेकरीमध्ये झालेला बाँबस्फोट सुंदर होता' असे 'टेरर फ्रँचाइजीज दि अनस्टॉपेबल अॅसासिनः टेक्स वाइटल रोल फॉर इट्स सक्सेस' या १५ पानी पत्रात म्हटले आहे. अमेरिकेने बुधवारी ही पत्रे उघड केली.
अल-कायदाचा नेता अबू सालिह अल सोमालीने अला-कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनशी भारतातील हल्ल्यांसदर्भात पत्रव्यवहार केला होता. ज्यामध्ये 'मुंबईवरील झालेला हल्ला हा शौर्यपूर्ण होता, असे म्हटले होते. या हल्ल्यात पश्चिमेकडील देशांतील नागरिकांसह अमेरिकी नागरिकही ठार झाले होते. तर ज्यू नागरिकांची वर्दळ असलेल्या पुण्यातील जर्मन बेकरी येथे घडलेला स्फोट सुंदर होता' असा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.
दरम्यान या पत्रातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, 'अल-कायदा'ला भारतीय व्यक्तीकडून पैसे पुरवण्यात येत असावे, असे संकेत या कागदपत्रांतून मिळाले आहेत. 'इंडियन ब्रदर इन मदिना' असा उल्लेख त्या कागदपत्रात असून त्या व्यक्तीने कधी व किती पैसे दिले त्याचा उल्लेखही आहे. तसेच अनेकांनी आपले दागिने विकून 'जिहाद'साठी पैसे दिले होते, अशी माहितीही पत्रातून समोर आली आहे. तो 'इंडियन ब्रदर' कोण हे शोधण्याचे आवाहन गुप्तचर संस्थांसमोर आहे.
या पत्रांमधून भारतासह अमेरिका आणि इस्त्रायलमधील हल्ल्यांसंदर्भातील अनेक खुलासे झाले आहेत.