Russia Ukrain War: दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात भीषण आणि प्रदीर्घ चाललेले रशिया-युक्रेन युद्ध आता भारतीय कुटुंबांसाठी चिंतेचा विषय बनले आहे. रशियन सैन्यात भरती झालेल्या २०२ भारतीयांपैकी तब्बल २६ जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे, अजूनही ५० भारतीय तरुण रशियाच्या युद्धभूमीवर मृत्यूशी झुंज देत असून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताचे परराष्ट्र मंत्रालय शर्थीचे प्रयत्न करत आहे.
आकडेवारी काय सांगते?
परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२ भारतीय या युद्धामध्ये सहभागी झाले आहेत. त्यापैकी २६ जणांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच दोघांचे पार्थिव दिल्लीत आणले गेले होते. तर ७ भारतीय तरुण रशियन सीमेवरून बेपत्ता आहेत. सरकारच्या प्रयत्नांमुळे ११९ भारतीयांची सुटका झाली असून ते घरी परतले आहेत. मात्र ५० भारतीय अद्याप रशियन सैन्यात आहेत.
कसे अडकले भारतीय तरुण?
२०२३ च्या सुरुवातीपासून दक्षिण आशियाई तरुणांना रशियन सैन्यात ओढण्याचे एक मोठे रॅकेट सक्रिय झाले. जास्त पगार, रशियन नागरिकत्व आणि सुखी जीवनाचे आमिष दाखवून तरुणांना फसवले गेले. अनेक तरुण विद्यार्थी किंवा पर्यटक व्हिसावर रशियाला गेले होते, मात्र तिथे पोहोचल्यावर त्यांना रशियन सैन्यात सामील होण्यासाठी सक्ती करण्यात आली.काही प्रकरणांमध्ये, रशियात किरकोळ गुन्ह्यात अडकलेल्या भारतीयांना तुरुंगवास भोगा किंवा आघाडीवर जाऊन युद्ध लढा असे दोनच पर्याय देण्यात आले. गुजरातच्या साहील हुसेन नावाच्या तरुणाने ७ वर्षांचा तुरुंगवास टाळण्यासाठी युद्ध निवडले, पण तीनच दिवसात त्याने युक्रेनसमोर शरणागती पत्करली.
नोव्हेंबर २०२४ मध्ये विद्यार्थी व्हिसावर गेलेल्या या तरुणाला सक्तीने सैन्यात घेतले गेले. सप्टेंबर २०२५ मध्ये डोनेस्तक येथील ड्रोन हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. ऑगस्ट २०२५ मध्ये विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या राकेशचा अवघ्या काही दिवसातच डॉनबासमध्ये मृत्यू झाला. रशियन लष्कराच्या सपोर्ट सर्व्हिसमध्ये काम करणाऱ्या केरळच्या एका तरुणाचाही या वर्षाच्या सुरुवातीला मृत्यू झाला.
केवळ रशियाच नाही, तर युक्रेनच्या इंटरनॅशनल लिजनमध्येही सुमारे १०० भारतीयांनी सहभाग घेतल्याचा अंदाज आहे. यामध्येही किमान दोन भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, मात्र अधिकृत आकडा अद्याप समोर आला नाही.
सरकारची भूमिका आणि प्रयत्न
परराष्ट्र मंत्रालयाने मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी १८ कुटुंबीयांचे डीएनएचे नमुने रशियन प्रशासनाकडे सोपवले आहेत. रशियन अधिकाऱ्यांशी उच्च स्तरावर चर्चा करून या तरुणांना करारातून मुक्त करण्यासाठी भारत सरकार दबाव निर्माण करत आहे. मृतदेह पाठवणे असो किंवा अडकलेल्यांना एअर तिकीट मिळवून देणे, यासाठी भारतीय दूतावास सक्रिय आहे.
दरम्यान, युक्रेन युद्धाला आता ३ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. रशियामध्ये मनुष्यबळाची मोठी टंचाई असल्याने ते आशियाई आणि आफ्रिकन तरुणांना भरती करत आहेत. शॅडी एजंट्स हे उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणाच्या बेरोजगार तरुणांना टार्गेट करत आहेत. मदत करण्याच्या नावाखाली अनेक एजंट्स तरुणांकडून लाखो रुपये घेतात आणि त्यांना रशियन सैन्याच्या स्पेशल मिलिटरी ऑपरेशनमध्ये ढकलून देतात.