आयफोन परत घेतला म्हणून १२ वर्षाच्या मुलीने केला आईच्या हत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: March 23, 2015 14:35 IST2015-03-23T14:29:35+5:302015-03-23T14:35:12+5:30
आय फोन परत घेतला म्हणून १२ वर्षाच्या मुलीने लागोपाठ दोन वेळा आईची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना अमेरिकेत घडली आहे.

आयफोन परत घेतला म्हणून १२ वर्षाच्या मुलीने केला आईच्या हत्येचा प्रयत्न
>ऑनलाइन लोकमत
कॉलोरेडो, दि. २३ - आय फोन परत घेतला म्हणून १२ वर्षाच्या मुलीने लागोपाठ दोन वेळा आईची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना अमेरिकेत घडली आहे. दुस-या प्रयत्नानंतर मुलीवर संशय आल्यावर मुलीच्या आईने पोलिसांशी संपर्क साधला व या सर्व प्रकरणाचा खुलासा झाला. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून तिला उपचारानंतर घरीदेखील सोडण्यात आले आहे.
अमेरिकेतील कोलोरेडो येथे राहणा-या एका महिलेने तिच्या १२ वर्षाच्या मुलीकडील आय फोन परत घेतला होता. आईच्या या निर्णयावर मुलगी संतापली व तिने थेट आईच्या हत्येचा कट रचला. २ मार्च रोजी तिने आईच्या ज्यूसमध्ये ब्लीच (साफसफाई वापरले जाणारे केमिकल) टाकून दिले. ज्यूस पित असताना महिलेला ग्लासमध्ये ब्लीचचा वास आला व तिने ज्यूस फेकून दिले. मुलीने ग्लास नीट न धुतल्याने ब्लीचचा वास येत असावा असे तिला वाटले. मात्र दोन दिवसांपूर्वी तिला ज्यूसमध्ये पुन्हा ब्लीचचा वास आला. यानंतर तिने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतले व चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून मुलीची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे. तिच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.