अफगाणिस्तानमध्ये भीषण अपघात झाला आहे. एक मोटरसायकल, एक मिनी ट्रक आणि प्रवासी बस यांच्यात झालेल्या अपघातात आग लागल्याने ६९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हेरात प्रांतामध्ये मंगळवारी हा अपघात झाला आहे. तिन्ही वाहने एकमेकांवर आदळली आणि हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे.
हेरात प्रांताचे रेस्क्यू टीमचे प्रमुख अब्दुल जाहिर नूरजई यांनी या अपघाताची माहिती दिली आहे. या अपघातात बहुतांश लोक अफगाणी शरणार्थी होते. ते इराणहून परत येत होते. अपघातानंतर बसला आग लागल्याने व मृतदेह पूर्ण जळाल्याने अनेक मृतदेहांची ओळख पटविणे कठीण असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. जखमींना इस्पितळांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मृतांचा आकडा वाढू शकतो, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. अपघाताची माहिती घेतली जात आहे, असे ते म्हणाले. गेली अनेक वर्षे अफगाणिस्तान टोळीयुद्ध, अमेरिकेने तालिबानचा नायनाट करण्यासाठी केलेले युद्ध आणि गरिबी यामुळे या देशात रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. यातच लोक शिकलेले नाहीत. यामुळे वाहने चालवितानाचे नियम माहिती नाहीत. यामुळे अपघात होत असल्याचे सांगितले जाते.