(संकलन : महेश घोराळे)
अमेरिकेच्या हवाई राज्यातील कौई बेटावरचा ८ फेब्रुवारी १९९० रोजीचा जन्म. लहानपणापासून समुद्रच माझं खेळणं होता. लाटा, वारा आणि निळाशार आकाशात रमले. तेव्हापासून पूर्ण विश्वास होता की, मी एक व्यावसायिक सर्फर होईल. सर्फिंग बोर्डवर मी स्वत:ला शोधत होते. प्रत्येक लाटेसोबत मोठी होत गेले. सागराशी एक नातं होतं. त्याचं रौद्ररूप, त्याच्या कुशीतली शांतताही पाहिली होती.
मी १३ वर्षांची होते. ऑक्टोबरमधील नेहमीप्रमाणे ती एक रम्य सकाळ. समुद्र शांत होता. मी आणि माझी मैत्रीण आम्ही सर्फिंग करीत होतो. अचानक १४ फूट उंचीची टायगर शार्क माझ्यावर तुटून पडली. मला खूप धक्का बसला. कसंही करून मला किनाऱ्यावर पोहोचायचे होते. काही सेकंदात माझा डावा हात खाद्यासह गेला. मी खूप घाबरले, कारण माझ्या हाताचा फारच थोडा भाग उरला होता.
जिवंत राहिले हेच खूप होते
मी यापुढे सर्फिंग करू शकेल की नाही ही भीती शार्कपेक्षाही अधिक होती. पण एक हात असल्याचे समाधानही होते. डॉक्टरांनी सांगितले की टाके काढल्यानंतर पुन्हा सर्फिंग करू शकते, त्यामुळे मन हलकं झालं. काही जणांनी सांगितलं, बेथनी, आता थांब. हे शक्य नाही. पण मी ठरवलं हार मानणार नाही.
मला माहीत होतं की आता एका हाताने सर्फिंग करण्याचा खूप प्रयत्न करावा लागेल. सुरुवातीला बॅलन्सवर खूप काम केले. एकाच हाताने इतक्या वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने कशा करायच्या हे शोधले.
कधी कधी मी निराश व्हायचे, मदत मागायचे; पण थांबले नाही. कारण शार्कच्या हल्ल्यातून जिवंत राहिले हेच माझ्यासाठी खूप काही होते. काही दिवसांनंतर पुन्हा पाण्यात उतरले. लाटांवर स्वार झाले. तेव्हा मागे वळून पाहिले नाही. अनेक सर्फिंग जेतेपदे जिंकली, अनेकांसाठी प्रेरणा बनले.
पुन्हा समुद्राशी मैत्री सोपी नव्हती..
लाटांवर उभं राहणं, पुन्हा एकदा समुद्राशी मैत्री करणं… सोपं नव्हतं. प्रत्येक अपयशाने मला आणखी शिकवलं. शार्कने माझा हात घेतला; पण माझं स्वप्न नाही. माझी ओळख माझ्या अपंगत्वात नाही, माझ्या जिद्दीत. मी हार मानली असती तर? कदाचित तुम्ही माझं नावही ऐकलं नसतं. मला सोप्पं आयुष्य नको होतं, मला अर्थपूर्ण आयुष्य हवं होतं.