मुंबई - पुण्यातील हर्षल जुईकर या विद्यार्थ्याने नुकतेच नॉन-इंजिनीअरिंग पदवीधर असूनही Google मध्ये भरघोस पगार मिळवून एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हर्षलचं कौशल्य आणि दृढनिश्चय ओळखून कंपनीने त्याला ५० लाखांच्या वार्षिक पॅकेजसाठी नियुक्त केले. तो गुगल डेव्हलपर स्टुडंट क्लबचा अध्यक्ष आहे. हर्षलनं त्याच्या करिअरची सुरुवात वार्षिक ५० लाख रुपये पॅकेजनं केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, हर्षल जुईकर MIT वर्ल्ड पीस यूनिवर्सिटीचा विद्यार्थी आहे. त्याने ब्लॉकचेन टेक्नोलॉजीमध्ये Msc केली आहे. मुंबई विद्यापीठातून त्याने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो पुण्यात गेला. आता तो गुगलसोबत जोडला गेला आहे. मेहनत आणि जिद्द या बळावर त्याने हे यशाचे शिखर गाठले आहे. त्याचा हा प्रवास अत्यंत संघर्षमय होता. परंतु कधीही तो मागे हटला नाही. पारंपारिक शिक्षणाचा मार्ग सोडत काहीतरी नवीन करण्याचा ध्यास त्याच्या मनात होता.
हर्षल जुईकर याने चांगल्या कंपन्यांमध्ये काम करण्याचे ध्येय असलेल्या विद्यार्थ्यांना सल्लाही दिला आहे. त्याच्या मते, नेहमी उत्सुकता बाळगा. एक्सप्लोर न केलेले क्षेत्र एक्सप्लोर करण्यास घाबरू नका. या शोधात तुमचा उद्देश शोधता येईल. विशेष म्हणजे तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्या महाविद्यालयीन पदवीधरांना उच्च-पगाराच्या पॅकेजवर नियुक्त करत आहेत. परंतु, यातील बहुतांश विद्यार्थी एकतर अभियांत्रिकी पार्श्वभूमी किंवा व्यवस्थापनातील आहेत. हर्षल जुईकरने कोणत्याही अभियांत्रिकी किंवा व्यवस्थापन पदवीशिवाय उच्च पॅकेजची नोकरी मिळवून एक प्रकारचा विक्रम केला आहे.