वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी जि.प.ची संगणकीय प्रणाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST2021-03-25T04:28:10+5:302021-03-25T04:28:10+5:30
२४ मार्च रोजी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये जि.प.अध्यक्ष गणाजी बेले, उपाध्यक्ष मनीष आखरे, सीईओ आर.बी.शर्मा यांच्या हस्ते www.zphingoli.in या वेबसाईटचे ...

वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी जि.प.ची संगणकीय प्रणाली
२४ मार्च रोजी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये जि.प.अध्यक्ष गणाजी बेले, उपाध्यक्ष मनीष आखरे, सीईओ आर.बी.शर्मा यांच्या हस्ते www.zphingoli.in या वेबसाईटचे अनावरण करण्यात आले. सदरील वेबसाईट मध्ये जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागाची योजनानिहाय माहिती आणि शासनाचे सर्व शासन निर्णय, जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम आदी अद्ययावत माहिती अपलोड करण्यात आली आहे. तसेच सीईओ शर्मा यांच्या संकल्पनेतून वैद्यकीय प्रतीपूर्तीचे अप्लिकेशन तयार केले आहे . वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक कशा पद्धतीने अपलोड करावे याबाबतची प्रत्यक्ष माहिती देवून सदरचे देयक कोणत्या स्टेजला आहे व किती दिवसांपासून प्रलंबित आहे, ही माहिती संबंधित विभाग प्रमुखांना लागलीच दिसणार आहे. उपमुकाअ धनवंतकुमार माळी यांनी स्थायी समितीत सर्व उपस्थितांना याचे प्रात्यक्षिक दाखविले. यामुळे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके विनाविलंब संबंधित कर्मचाऱ्यांना अदा करण्यास मदत होईल व वेळही वाचेल. सर्व व्यवहार पेपरलेस होईल. यावर जि.प.सदस्य अंकुश आहेर यांनी सदरील कल्पना छान असून ही सुरळीत चालली तर कर्मचाऱ्यांना लाभ होईल, असे सांगितले.
अनेक विभागांची माहितीच नाही
आजपर्यंत जि. प. चे स्वतःचे संकेतस्थळ नसल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसीच्या संकेत स्थळावरून जाहिराती व इतर माहिती प्रसिद्ध करीत होते. जिल्हा परिषदच्या या नवीन संकेत स्थळावर आणखी विभागनिहाय योजना व इतर माहिती भरणे सुरू आहे. मात्र काही विभागांना उदासीनतेचा जडलेला आजार या उपक्रमावर परिणाम करू शकतो. यासाठी जि.प. सीईओंना कडक भूमिका घ्यावी लागेल. अन्यथ वेबसाईट विकासावर खर्च झालेला पैसा पाण्यात गेल्यात जमा आहे, असे समजायला हरकत नाही.