जिल्हा परिषदेतील धुसफूस; अधिकाऱ्यांची डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST2021-06-18T04:21:30+5:302021-06-18T04:21:30+5:30
हिंगोली जिल्हा परिषदेत आतापर्यंत विरोधक असले तरीही त्यांना पक्षभेदानंतरही तशी वागणूक कधी मिळायची नाही. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीच परंपरा ...

जिल्हा परिषदेतील धुसफूस; अधिकाऱ्यांची डोकेदुखी
हिंगोली जिल्हा परिषदेत आतापर्यंत विरोधक असले तरीही त्यांना पक्षभेदानंतरही तशी वागणूक कधी मिळायची नाही. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीच परंपरा राहिली आहे. इतर काही जिल्ह्यांतील चित्र पाहता हिंगोलीत असलेली ही पद्धत विकासकामांच्या नियोजनासाठी अतिशय पोषक असायची. त्याचबरोबर प्रत्येक बाबीमध्ये सदस्यांची असलेली एकजूट अधिकाऱ्यांवरही दबाव निर्माण करणारी असायची. सभागृहाच्या या एकजुटीपुढे कुणालाच लहरी कारभाराची संधी मिळायची नाही.
शिक्षण व अर्थ सभापती रत्नमाला चव्हाण यांच्यावरील अविश्वासानंतर मात्र वातावरण बदलले आहे. अविश्वासाला समर्थन न देणारे आता अजेंड्यावर आले आहेत. त्यांना आगामी काळात अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. मात्र सदस्यांच्या या एकमेकांना पाण्यात पाहण्याच्या दृष्टिकोनात अधिकाऱ्यांना आपण भरडले जाईल, याची भीती वाटत आहे. त्यातच काही विभागांचा आधीच ढेपाळलेला कारभार यामुळे चव्हाट्यावर येण्याचीही भीती आहे. सत्ताधारी कितीही सावरून नेण्याचा प्रयत्न करणारे असले तरीही विरोधकही तेवढेच आक्रमक आहेत. मात्र काही विभागाचे अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अशांना पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत पाठीशी घातले. मात्र किती काळ ते निभावून नेतील, हा प्रश्न आहे. बांधकाम विभाग निशान्यावर असून या विभागाचीही भंबेरी उडाल्याचे दिसत आहे. या अधिकाऱ्यांना फक्त पदाधिकारीच वाचवू शकतील, असे दिसत आहे.