कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:24 IST2021-07-17T04:24:03+5:302021-07-17T04:24:03+5:30
हिंगोली : पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ‘झिका’ व्हायरसचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. असे असले तरी अजून तरी ‘झिका’ आजाराचा ...

कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका !
हिंगोली : पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ‘झिका’ व्हायरसचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. असे असले तरी अजून तरी ‘झिका’ आजाराचा रुग्ण जिल्ह्यात आढळून आलेला नाही. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने जिल्ह्यात सर्वच ठिकाणी औषध फवारणीचे आदेश दिले आहेत.
झिका आजार एडीस डासामुळे पसरतो. याच डासामुळे डेंग्यू आणि चिकुनगुनिया हा आजारही होऊ शकतो. सदर डास हा सर्वच ठिकाणी आढळून येत असल्यामुळे झिका आजार होण्याची शक्यता आहे. यासाठी घरापासून परिसरापर्यंत स्वच्छता ठेवणे हे नागरिकांचे आद्यकर्तव्य आहे. अंगणात किंवा परिसरात साचलेले पाणी राहता कामा नये, टायर किंवा इतर कुजलेल्या वस्तू घराच्या आसपास दिसता कामा नये, पाण्याची टाकी दोन दिवसांआड स्वच्छ करावी, असेही आरोग्य विभागाने सूचित केले आहे.
पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन आरोग्य विभागाने स्वच्छता मोहीम राबविली आहे. यावेळी नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून आपल्या वॉर्डातील नाल्यांवर औषधाची फवारणी करून घ्यावी. जिल्ह्यातील सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांना औषध फवारणीबाबत सूचना दिलेल्या आहेत.
कशामुळे होतो?
अस्वच्छता व घाण पाणी वाहत असेल, तर अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती होते. या अस्वच्छतेतूनच ‘झिका’ हा आजार उद्भवू शकतो. यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला परिसर स्वच्छ ठेवावा. डेंग्यू, मलेरिया या आजारांसारखाच ‘झिका’ हा त्रासदायक असाच आजार आहे.
झिका व्हायरसची लक्षणे काय?
झिका आजाराची लक्षणे ही डेंग्यू आजारासारखी आहेत. या आजाराचा कालावधी निश्चित सांगता येत नाही. डोके दुखणे, ताप येणे, थकवा येणे, स्नायू दुखी, अंगावर पुरळ येणे, डोळे येणे, सांधे दुखणे, डोळे दुखणे आदी प्रकारची लक्षणे आरोग्य विभागाने सांगितली आहेत.
उपाययोजना काय?
राष्ट्रीय रोगनिदान संस्था नवी दिल्ली, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे येथे ‘झिका’ या आजाराच्या निदानाची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. डेंग्यू आजाराप्रमाणे झिका संशयित रुग्णांचे रक्त, रक्तद्रव तपासणीसाठी पाठविले जाते. झिका आजाराची लक्षणे आढळून आल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधणे गरजेचे आहे.
प्रतिक्रिया
झिका आजारावर कोणतेही विशिष्ट औषध अथवा लस सध्यातरी उपलब्ध नाही. त्या रुग्णावर लक्षणानुसार उपचार केला जातो. ताप येणे, अंग दुखणे, असे प्रकार आढळून आल्यास त्या व्यक्तीने पुरेशी विश्रांती घेणे गरजेचे आहे. तापाकरिता पॅरॉसिटामॉल घेणे आवश्यक आहे. फारच त्रास जाणवत असेल, तर जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, म्हणजे उपचार करणे सोपे होईल.
-डॉ. गणेश जोगदंड, जिल्हा हिवताप अधिकारी