मराठा आरक्षणासाठी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथील घटना
By रमेश वाबळे | Updated: March 30, 2024 18:14 IST2024-03-30T18:13:57+5:302024-03-30T18:14:08+5:30
वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथील निवृत्ती सवंडकर हा मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून निराश होता.

मराठा आरक्षणासाठी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथील घटना
वसमत (जि.हिंगोली) : तालुक्यातील टेंभुर्णी शिवारात एका २२ वर्षीय तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३० मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. निवृत्ती नामदेव सवंडकर (रा.टेंभुर्णी) असे मयताचे नाव असून, त्याच्या खिशात चिठ्ठी आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथील निवृत्ती सवंडकर हा मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून निराश होता. आंदोलने करूनही आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नसल्याचे तो बोलून दाखवित होता, असे नातेवाइकांनी सांगितले. ३० मार्च रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास निवृत्ती सवंडकर याने टेंभुर्णी शिवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती हट्टा पोलिस ठाण्यात मिळताच, सहायक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, फौजदार सतीश तावडे, कृष्णा चव्हाण, शेख असेफ यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. मयताच्या खिशात चिठ्ठी सापडली असून, त्यात मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख असल्याची माहिती आहे. घटनेप्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती.