रिक्षाचालकांच्या वागणुकीला लगाम घालणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:04 IST2021-09-02T05:04:07+5:302021-09-02T05:04:07+5:30
कोरोना महामारी कमी झाल्यामुळे शासनाने अनलाॅक केले आहे. त्यामुळे नागरिक बाजारपेठेत वस्तू खरेदी करू लागले आहेत. अशावेळी काही रिक्षाचालक ...

रिक्षाचालकांच्या वागणुकीला लगाम घालणार कोण?
कोरोना महामारी कमी झाल्यामुळे शासनाने अनलाॅक केले आहे. त्यामुळे नागरिक बाजारपेठेत वस्तू खरेदी करू लागले आहेत. अशावेळी काही रिक्षाचालक रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभी करत आहेत. आरडाओरड करून नागरिकांचे लक्ष विचलित करत आहेत. रस्त्यातून जात असलेल्या नागरिकालाही हाक देतात. नागरिकाने मागे वळून पाहिल्यास रिक्षामध्ये बसतात. जवळच्या गल्लीत जायचे झाले तरी दाम दुप्पट घेत आहेत. उलट प्रवाशांना दमदाटी करत आहेत. शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरात पार्किंग असताना गेटच्या मधोमध गाडी उभी करतात. बसस्थानकामध्ये तर प्रवाशांना उतरू पण देत नाहीत. कित्येक वेळा प्रवाशांशी हुज्जत घालतात.
या घटनांना जबाबदार कोण?
सध्या सणासुदीचे दिवस आहेत. ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी शहरात येत आहेत. बाजार करून रीक्षात बसल्यानंतर घाईगडबडीत वस्तू रिक्षात विसरून राहते. अशावेळी विचारणा केल्यास रिक्षात काहीच नव्हते. तुम्ही बाजारात विसरला असताल, असे म्हणून हात झटकतात.
रिक्षामध्ये तीनच प्रवासी घेण्याची परवानगी आहे. परंतु काही रिक्षाचालक चार ते पाच प्रवासी घेत आहेत. प्रवाशांना रिक्षात बसवून इतर प्रवासी शोधत असतात. काही रीक्षाचालक एकेरीवर येण्यासही मागेपुढे पाहत नाहीत.
विनापरवाना रिक्षा एक डोकेदुखी...
शहरात विनापरवाना रिक्षा जवळपास १२० आहेत. काही रिक्षाचालक वाटेल तशी मनमानी करतात. ग्रामीण भागातून आलेल्या प्रवाशांना अव्वाच्या सव्वा भाडे सांगतात. एखादा रुपयासाठी भांडणावर येतात. कित्येकवेळा अर्ध्या रस्त्यात सोडतात. प्रत्येकाकडे स्वत:चे वाहन नसते. अशावेळी मजबुरीचा फायदा घेतात. परत हेच रिक्षाचालक धमकी द्यायला मागेपुढे पाहत नाहीत.
रितसर तक्रार करणे योग्यच
रीक्षामध्ये बसल्यानंतर एखादा रीक्षाचालक जर उद्धटपणे बोलत असेल किंवा ऐकण्याच्या मन:स्थितीत नसेल तर त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करावी. तक्रारीच्या आधारे त्या रीक्षाचालकावर कारवाई करण्यात येईल.
-पंडित कच्छवे, पोलीस निरीक्षक, हिंगोली शहर
प्रवासाला जाताना स्वत:ची व परिवाराची काळजी घ्यावी. रिक्षामध्ये बसण्याअगोदरच भाड्याचे बोलून घ्यावे. रिक्षाचालक कोणत्याही प्रकारचा वाद घालत असेल तर जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन सांगावे.
— अनंता जोशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी