हिंगोली : ट्रिपल सीट वाहने चालविणे हा गुन्हा असला तरी अनेक जण सर्रासपणे ट्रिपल सीट वाहने चालवून नसती आफत ओढवून घेत आहेत. १२८ कलमान्वये अशा वाहनचालकांवर कारवाई होऊन त्यांना २५० रुपये दंड लावण्याची तरतूद सुरू आहे.
शहरातील इंदिरा चौक, महावीर चौक, गांधी चौक, नांदेड नाका, औंढा रोड आदी भागांमध्ये पोलिसांच्या वतीने कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. ट्रिपल सीट वाहन चालविणे, कर्णकर्कश आवाज करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे आदी प्रकार आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.
४ सप्टेंबर रोजी ट्रिपल सीट जाणे, कर्णकर्कश आवाज करणे, विरुद्ध दिशेने जाणे आदी प्रकार मोहिमेदरम्यान पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी ८० वाहने जप्त करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कलम १२८ अंतर्गत कारवाई केली. ट्रिपल सीट वाहन चालवून लायसन्स नसेल तर ५०० रुपये दंड, ट्रिपल सीट बसून विरुद्ध दिशेने गाडी चालवीत असेल तर १ हजार रुपये दंड ठोठावण्याची तरतूद या कलमात आहे. तेव्हा वाहनचालकांनी नियमांचे पालन करून पोलीस विभागास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दुचाकी वाहनचालकांनो, हे नियम पाळा...
सध्या सर्वत्र अनलॉक झाले असून बाजारात खरेदीसाठी रेलचेल वाढली आहे. तेव्हा वाहने सावकाश चालवावी.
दुचाकीचालकाने दुचाकी व्यवस्थित चालवावी. पार्किंग असेल अशा ठिकाणी आपले वाहन उभे करावे.
गर्दीच्या ठिकाणावरून ट्रिपल सीट दुचाकी चालवू नये.
बाजारात कर्णकर्कश आवाज करून दुचाकी चालवू नये.
सायलेन्सर जर आवाज देत असेल तर असे वाहन वापरात आणू नये.
सायलेन्सरच्या आवाजामुळे इतरांना त्रास होईल असे कृत्य करू नये.
काय आहे १२८ कलम...
लायसन्स जवळ न बाळगणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे, वाहतूक पोलिसांनी बोलावूनही वाहन पुढेच घेऊन जाणे, वाहन विरुद्ध दिशेने नेल्यास त्यास १ हजार रुपये दंड तर लायसन्स नसल्यास त्यास ५०० रुपये दंड भरावा लागतो. तेव्हा नियमांचे पालन करावे, असे पोलीस विभागाने सांगितले.
नियमांचे पालन करा...
सध्या सणासुदीचे दिवस आहेत. बाजारात नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अशा वेळी दुचाकीस्वारांनी ट्रिपल सीट गाडी चालवू नये. ट्रिपल सीट गाडी चालविल्यास वाहनावर नियंत्रण राहत नाही. कित्येक वेळा अपघाताला सामोरे जावे लागते. वाहनचालकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
- चंद्रशेखर कदम, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा
११३६
फोटो