शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबदार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:29 IST2021-09-11T04:29:28+5:302021-09-11T04:29:28+5:30
हिंगोली : शहरातील मोक्याच्या ठिकाणी जी काही होर्डिंग्ज लावलेली दिसत आहेत ती अनधिकृत नाहीत. त्यांच्याकडून १० रुपये फुटांप्रमाणे दिवसाला ...

शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबदार कोण?
हिंगोली : शहरातील मोक्याच्या ठिकाणी जी काही होर्डिंग्ज लावलेली दिसत आहेत ती अनधिकृत नाहीत. त्यांच्याकडून १० रुपये फुटांप्रमाणे दिवसाला कर वसूल केला जातो, असे नगरपालिकेने स्पष्ट केले आहे.
शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, महावीर चौक, नांदेड नाका अशा चार ते पाच ठिकाणी जवळपास ४२ जणांनी होर्डिंग्ज लावले आहेत. त्यांच्याकडून १० रुपये फुटांप्रमाणे दिवसाला कर वसूल केला जातो. ज्यांच्या होर्डिंग्जची तारीख संपलेली आहे, अशांना दहा दिवस आधी होर्डिंग्ज काढण्याची सूचना दिली जाते. सूचना देऊनही त्यांनी काढले नाही तर दोन रुपयांप्रमाणे दिवसाला त्यांना दंडही आकारला जातो. शहराचे विद्रुपीकरण होणार नाही याची पुरेपूर काळजी नगर परिषदेच्या वतीने घेतली जाते.
या ठिकाणांकडे लक्ष कोण देणार?
शहरातील नांदेडनाका ते गांधी चौकापर्यंत अनेक होर्डिंग्ज लावले आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष त्याकडे जात आहे. कित्येक वेळा त्याकडे पाहत किरकोळ अपघातही होत आहेत. अशावेळी यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
वर्षभरापासून कारवाई नाही....
गत दीड वर्षापासून कोरोना महामारी होती. त्यामुळे कोणीच होर्डिंग्ज लावलेले नव्हते. काही मोजकेच होर्डिंग्ज त्या काळात होते; पण त्यांनीही परवानगी घेतलेली होती. त्यामुळे कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. कर विभागाने वेळोवेळी अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई केली आहे.
काय होऊ शकते कारवाई?
होर्डिंग्जची मुदत संपलेली असेल तर त्यांना आधी सूचना दिली जाते. सांगूनही त्यांनी ऐकले नाही तर २ रुपये फुटांप्रमाणे दिवसाला कर लावत त्या होर्डिंग्ज मालकावर कारवाई केली जाते.
प्रतिक्रिया...
मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांना विचारल्याशिवाय कोणतेही होर्डिंग्ज शहरात लावले जात नाहीत. शहराचे विद्रुपीकरण होणार नाही, याची दक्षता प्रथम घेतली जाते.
-उमेश हेंबाडे, कर निरीक्षक तथा उपमुख्याधिकारी
नागरिक काय म्हणतात...
शहरात अनेक ठिकाणी होर्डिंग्ज लावले आहेत; पण हे होर्डिंग्ज अधिकृत आहेत की अनधिकृत हे काही कळायला मार्ग नाही. मुदत संपलेली असेल तर ते लवकरात लवकर काढायला पाहिजे.
मुरली कल्याणकर, नागरिक
खरे पाहिले तर वाढदिवस, शुभेच्छा असे होर्डिंग्ज शहरात लावूच नयेत. अशा प्रकारामुळे शहराचे विद्रुपीकरण होते. नगरपालिकेने ते तातडीने काढून टाकायला पाहिजे; पण नगरपालिका का काढत नाही, नगरपालिकेने यासाठी जागा ठरवून द्यायला पाहिजे.
- महेश राखोंडे, नागरिक