जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:31 IST2021-03-23T04:31:53+5:302021-03-23T04:31:53+5:30

मागील वर्षी राज्य शासनाने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली ...

When will farmers in the district get incentive grants? | जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार?

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार?

मागील वर्षी राज्य शासनाने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाची अद्यापही प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू झाली नाही. अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अद्यापही जमा करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. प्रोत्साहनपर अनुदान बँक खात्यावर जमा झाले का याची विचारपूस करण्यासाठी शेतकरी बँका गाठत आहेत. मात्र त्यांना आल्या पावली निराश होऊन परत जावे लागत आहे.

तालुका उपनिबंधक अधिकाऱ्यांची उदासीनता

वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यासाठी सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे निधीही उपलब्ध झाला आहे. वसमत, हिंगोली व औंढा तालुक्यातील शेतकऱ्यांची यादी वगळता कळमनुरी व सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची यादीच उपलब्ध नसल्याने हा निधी पडून असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून देण्यात आली.

९० हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

जिल्ह्यात आतापर्यंत ९० हजार ६३६ शेतकरी कर्जमुक्त झाले असून, त्यांच्या बँक खात्यावर ५८९.५३ कोटी रुपयांची रक्कमही जमा झाली आहे. मात्र अद्याप काही शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रतीक्षाच आहे. जिल्ह्यातील दोन हजार २४० शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी केल्या होत्या. त्यापैकी जिल्हा स्तरावर १०८३ तक्रारी निकाली काढण्यात आल्या, तर अजूनही २९ तक्रारी प्रलंबित आहेत. शिवाय तालुकास्तरावर १०८९ तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून, ३४ तक्रारी प्रलंबित आहेत.

मागील तीन-चार वर्षांपासून महाराष्ट्र ग्रामीण बँकेमधून कर्ज काढतो. तसेच नियमित भरणाही करतो. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला असला तरी मला अद्याप प्रोत्साहनपर अनुदान मिळाले नाही.

- शंकर महादा काळे, हनवतखेडा

आखाडा बाळापूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून कर्ज घेत असतो. या कर्जाचे पुनर्गठनही केले आहे. मात्र अद्याप बँक खात्यात प्रोत्साहनपर अनुदान जमा झाले नाही.

- शंकर मुलगीर, पोतरा

तालुकानिहाय शेतकरी

हिंगोली : २४८१

वसमत : ३९७७

औंढा : १५०

Web Title: When will farmers in the district get incentive grants?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.