जंगलात पाणवठे आटले; पाण्याच्या शोधात रत्यावर आलेल्या हरणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2023 14:04 IST2023-05-30T14:03:50+5:302023-05-30T14:04:57+5:30
हरणाचा मृतदेह दोन तास रस्त्यावर पडून होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कसलीही माहिती नव्हती.

जंगलात पाणवठे आटले; पाण्याच्या शोधात रत्यावर आलेल्या हरणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू
- इस्माईल जाहगीरदार
वसमत: तालुक्यातील कोठारी परिसरात जंगलातून पाण्याच्या शोधासाठी हरण रस्त्यावर आले. यावेळी भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्याने तहानलेल्या हरणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजे दरम्यान घडली.
वसमत तालुक्यातील टोकाई देवी-कोठारी मार्गावर जंगल परिसर आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे जंगलातील पाणवठे आटले आहेत. यामुळे तहानलेल्या प्राणी जंगलाबाहेर येण्याच्या घटना वाढल्यात. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास पाण्याच्या शोधासाठी जंगलातून एक हरण रस्त्यावर आले. याचवेळी भरधाव वाहनाने हरणास जोरदार धडक दिली. यात हरणाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, हरणाचा मृतदेह दोन तास रस्त्यावर पडून होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कसलीही माहिती नव्हती.
गत दोन महिन्यांपासून वातावरणात बदल झाला आहे. तापमान ४१ ते ४२ अंश डिग्री सेल्सिअस वर पोहोचले आहे. यामुळे पाणवठे आटले आहेत. मात्र, याकडे वनविभागाच्या दुर्लक्षाने तहानेल्या प्राण्यांना पाण्याच्या शोधात जगलाबाहेर पडावे लागते. रस्त्यावर आलेल्या प्राण्यांचा अपघातात जीव जात आहे. मागच्या महिनाभरापासून वसमत परिसरात निलगाय, वानरे, रानडुक्कर, कोल्हे, लांडगे आदी वन्यप्राणी पाणी व अन्नाच्या शोधात गाव कुसात येत आहेत. काही सामाजिक संघटनांनी जंगलात वनविभागाला पाणवट्याची सोय करावी, अशी सूचना केली होती. परंतु वनविभागाच्या एकाही अधिकाऱ्यांनी याला दाद दिली नाही. परिणामी वन्य प्राण्यांना मृत्यूच्या दाढेत जावे लागत आहे.