१३ गावांत पाणीटंचाईची चाहूल; उन्हाची तीव्रता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:30 IST2021-03-27T04:30:49+5:302021-03-27T04:30:49+5:30
येथील पंचायत समितीने जानेवारी ते जूनपर्यंतचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. तो जिल्हा प्रशासनाने मंजूरही केला आहे. ...

१३ गावांत पाणीटंचाईची चाहूल; उन्हाची तीव्रता वाढली
येथील पंचायत समितीने जानेवारी ते जूनपर्यंतचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. तो जिल्हा प्रशासनाने मंजूरही केला आहे. हा आराखडा ३ कोटी १३ लाख ६० हजारांचा आहे. संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याची अंमलबजावणीही होणे गरजेेचे आहे. पुढील आठवड्यात बिबगव्हाण, महालिंगी तांडा, पानबुडी वस्ती, माळधावंडा, रामवाडी, हातमाली, जांब, नरवाडी, गोटेवाडी, गागापूर, हरवाडी, खरवड आदी गावांत पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.
जानेवारी ते मार्चपर्यंतचा पाणीटंचाई आराखडा २ कोटी ४८ लाख ८ हजारांचा असून, एप्रिल ते जूनदरम्यानचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा ६५ लाख ५२ हजारांचा आहे. जानेवारी ते मार्चदरम्यान तात्पुरती पूरक नळयोजना २३ गावांत तयार करण्यासाठी १ कोटी ३३ लाख ८० हजार, नळ योजना विशेष दुरुस्तीसाठी पंचवीस लाख, नळ योजना विशेष दुरुस्ती दोन गावांत केली जाणार आहे. त्यात मोरवाडी प्रादेशिक २५ गाव पाणीपुरवठा योजना व पोतरा येथील गावातही नळ योजना विशेष दुरुस्ती केल्या जाणार आहे.
१२५ गावांत १४४ नवीन विंधन विहीर घेण्यासाठी ८९ लाख २८ हजारांचा आराखडा तयार आहे. एप्रिल ते जूनदरम्यान ७६ गावांत ९८ विहीर व बोअरच्या अधिग्रहणासाठी ५२ लाख ९२ हजार, तसेच बीबगव्हाण, महालिंगी तांडा, पाणबुडी वस्ती, माळधावंडा, रामवाडी, हातमाली या ६ गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी १२ लाख ६ हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. येत्या आठवड्यात काही गावात टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे.
तालुक्यात १,१७० हातपंप असून, दुरुस्ती अभावी ३५ ते ४० हातपंप बंद आहेत. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून, दुपारच्या वेळेला कडक ऊन जाणवत आहे. उपलब्ध जलस्रोत आटत चालले आहेत. मागील दोन वर्षांपासून अतिवृष्टी होत असल्याने तालुक्यातील भूजलाची पातळी वाढलेली आहे. दुसरीकडे मागील दोन वर्षांपासून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेंतर्गत काही गावांत जलसंधारणाची मोठ्या प्रमाणावर कामे झाली असल्यामुळे तेथील भूजल पातळी वाढलेली आहे.
सध्या कडक उन्हाळा जाणवत असून, उपलब्ध जलस्रोत आटत चालले आहेत. हातपंपाच्या पाण्याची पातळीही खालावल्या जात आहे. त्यामुळे पाणीटंचाई बहुतांश गावात जाणवू लागली आहे. काही गावांतील ग्रामस्थ शेतातील विहिरीतून पाणी आणत आहेत. आतापर्यंत पंचायत समितीकडे एकाही गावाने अधिग्रहण व टँकरचा प्रस्ताव दिलेला नाही, परंतु येत्या आठवड्यात पाणीटंचाईबाबतचे अहवाल येणार असल्याची शक्यता आहे. पंचायत समिती स्तरावर पाणीटंचाईच्या उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठ्याचे केशव सावंत यांनी दिली.
आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी
गावात पाणीटंचाई भासत असल्यास, ग्रामपंचायतीने तसा अहवाल पंचायत समितीकडे सादर करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. मागील दोन वर्षांपासून तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टीमुळे भूजल पातळी वाढलेली आहे. येत्या एप्रिल महिन्यात अनेक गावात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी संभाव्य पाणीटंचाई आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे. येत्या एप्रिल व मे महिन्यात तालुक्यातील अनेक गावांत पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.