दुष्काळी छायेने घेतले दोन बळी

By Admin | Updated: August 13, 2014 00:24 IST2014-08-13T00:07:06+5:302014-08-13T00:24:44+5:30

सेनगाव : तालुक्यातील चिखलागर तांडा येथे गेल्या दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

Two victims of drought | दुष्काळी छायेने घेतले दोन बळी

दुष्काळी छायेने घेतले दोन बळी

सेनगाव : तालुक्यातील चिखलागर तांडा येथे गेल्या दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यावर्षीची दुष्काळी स्थिती व कर्जाचा डोंगर या दुहेरी संकटामुळे शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या लहानशा तांड्यावर कुणीही फारसा श्रीमंत शेतकरी नाही. अनेकांची बेताचीच परिस्थिती. आत्महत्याग्रस्त शेतकरीही याच पठडीतले. त्यामुळे त्यांना दुष्काळी परिस्थिती पहावली नाही. हरी रामराव राठोड (वय ४०) यांनी सततच्या नापीकीमुळे व शेतातील दुबारपेरणी व कर्जबाजारीपणामुळे शेतातील एका झाडाला १० आॅगस्ट रोजी गळफास घेवून आत्महत्या केली. या बाबत परिसरात हळहळ व्यक्त होत असतानाच अंकुश चांदू चव्हाण (वय ८२) यांनी शेतातील सर्व पिके वाया गेली, दुबार पेरणी तसेच मुलीचे लग्न डोळ्यासमोर असल्याने कर्ज फेडणे अशक्य असल्याचे कारणाने ११ आॅगस्ट रोजी विष घेतले. दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्यामुळे दोन्ही कुटुंबिय उघड्यावर आले आहेत.
सेनगाव तालुक्यात अल्प पावसाचे प्रमाण असून चिखलागर तांडा येथे सुद्धा पाऊस समाधानकारक न झाल्यामुळे कसेबसे या शेतकऱ्यांनी एकदाची पेरणी केली होती; परंतु प्रचंड पाण्याचा दुष्काळ व त्यातून होणारी हेळसांड, हातचे सोयाबीन पीक गेल्याने आता कर्ज फेडणे अशक्य असल्याने या शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
आत्महत्या केलेले शेतकरी हरी श्यामराव राठोड यांना जेमतेम दोन ते अडीच एकर जमीन असून ती कोरडवाहू आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असताना ही घटना घडली आहे. त्यांच्या पश्चात २ मुले व ३ मुली, भाऊ, बहिण असा परिवार आहे.
दुसरे शेतकरी अंकुश चांदू चव्हाण यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांना दोन मुले, तीन मुली, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्याकडे सुद्धा दोन एकर खरबाळ जमीन असून ती पाण्याअभावी नापीक झाली आहे. यातूनच या दोन्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Two victims of drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.