आज दिली जाणार दोनशे डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:34 IST2021-01-16T04:34:46+5:302021-01-16T04:34:46+5:30
हिंगोली : अवघ्या देशवासीयांचे ज्या कोरोना लसीकडे लक्ष लागले होते ती लस शनिवारी, १६ जानेवारी रोजी जिल्ह्यातील दोनशे डॉक्टरांसह ...

आज दिली जाणार दोनशे डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना लस
हिंगोली : अवघ्या देशवासीयांचे ज्या कोरोना लसीकडे लक्ष लागले होते ती लस शनिवारी, १६ जानेवारी रोजी जिल्ह्यातील दोनशे डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना सकाळी साडेआठ वाजता दिली जाणार आहे. हा कार्यक्रम दिवसभर सुरू राहील, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.
जिल्ह्यातील सर्व डॉक्टर, आरोग्यसेवक, परिचारिका आणि इतर कर्मचारी असे मिळून जवळपास दोनशे कर्मचाऱ्यांना ही कोरोना लस प्रथम टप्प्यात दिली जाणार आहे. यासाठी दोन केंद्र असून त्यात हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय व कळमनुरी येथील जिल्हा उपरुग्णालयाचा समावेश आहे. हिंगोली येथील सामान्य रुग्णालयात १०० व कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात १०० असे दोनशेजण लस घेणार आहेत. सीरम इन्स्टिट्यूटने मंगळवारी पुणे येथून देशातील विविध ठिकाणांना या कोरोना लसीचा पुरवठा सुरू केला आहे. जिल्ह्यातील डॉक्टर, आरोग्यसेवक, कर्मचाऱ्यांनी कोरोना लस घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यवंशी यांनी केले आहे.
ही लस सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी नि:संकोचपणे घ्यावी. विशेष म्हणजे ही लस प्रभावी आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये लसीविषयी अधिक प्रमाणात विश्वास निर्माण होईल, असे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मंगेश टेहरे यांनी सांगितले.