टोमॅटोचा भाव एकदम उतरला; मंडईत लागला टोमॅटोचा ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:28 IST2021-03-24T04:28:01+5:302021-03-24T04:28:01+5:30
यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले राहिले आहे. मार्च महिना अर्ध्यावर आला असला तरी पाण्याची कमतरता नाही. भाजीपाल्याचे उत्पादनही शेतकरी ...

टोमॅटोचा भाव एकदम उतरला; मंडईत लागला टोमॅटोचा ढीग
यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले राहिले आहे. मार्च महिना अर्ध्यावर आला असला तरी पाण्याची कमतरता नाही. भाजीपाल्याचे उत्पादनही शेतकरी मोठ्या प्रमाणात काढत आहेत. परंतु, कोरोना संसर्गामुळे ग्राहक बाहेर पडण्यास धजत नाहीत. त्याचबरोबर भाजी विक्रेत्यांना सकाळी दहा ते दुपारी तीन अशी वेळ भाजी विक्रीसाठी दिली आहे. त्यामुळे वेळेचे भान ठेवत भाजीपाला विकण्याची वेळ विक्रेत्यावर आली आहे.
जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे नियम घालून दिल्यामुळे ग्राहकही वेळेतच भाजी खरेदीसाठी येत आहेत. भाजी मंडईसाठी दुपारी तीनची वेळ दिली असली तरी अडीच वाजल्यापासूनच भाज्या गुंडाळून ठेवण्याची तयारी करावी लागते. टोमॅटोबरोबरच इतर भाज्यांचेही भाव मंगळवारी उतरले होते. शेवगा १०, मेथी १०, कांदा १०, काकडी ६, चवळी १०, वांगे ५, कोथिंबीर ५ छटाक, कद्दू ५ रुपयास एक, पता कोबी ५, फूल कोबी ५ रुपये, गाजर ८ रुपये किलो, हिरवी मिरची १० रुपये, भेंडी २० रुपये किलो याप्रमाणे विक्री झाली.
शेतकऱ्यांना आर्थिक फटका
जिल्ह्यातील डिग्रस कऱ्हाळे, लिंबाळा, डोंगरकडा, खानापूर, सावरखेडा, पिंपळखुटा, बासंबा, बळसोंड आदी जवळपासच्या खेड्यातून भाजी उत्पादक शेतकरी भाज्या घेऊन मंडईत येतात. परंतु, मंडईतील ठोक विक्रेते कोरोना आजारामुळे ग्राहक मिळेना झाले असल्यामुळे शेतकऱ्यांकडील भाज्या कमी प्रमाणात विकत घेत आहेत. त्यामुळे टेम्पो व इतर वाहनांनी आणलेल्या भाज्या परत नेण्याऐवजी कमी किमतीत ठोक विक्रेत्यांना देत आहेत. त्यामुळे भाजी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. दुसरीकडे छोटे भाजी विक्रेते तीन वाजेपर्यंत जेवढ्या भाज्या विकतील तेवढ्याच खरेदी करीत असल्याचे मुजीब बागवान यांनी सांगितले.