वेळेवर औषधोपचार क्षयरोग मुक्तीसाठी रामबाण उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:27 IST2021-03-24T04:27:41+5:302021-03-24T04:27:41+5:30
हिंगोली : क्षयरोग हा दुर्धर आजार नसून, वेळेवर औषधोपचार आणि संपूर्णपणे घेतला, तर क्षयरोगही बरा होण्यास मदत होते. हताश ...

वेळेवर औषधोपचार क्षयरोग मुक्तीसाठी रामबाण उपाय
हिंगोली : क्षयरोग हा दुर्धर आजार नसून, वेळेवर औषधोपचार आणि संपूर्णपणे घेतला, तर क्षयरोगही बरा होण्यास मदत होते. हताश न होता वेळेवर औषध घेणे, हाच रामबाण उपाय आहे. क्षयरोग दिनानिमित्त शहरात मास्कचे वाटप केले जाणार असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग विभागाच्या वतीने देण्यात आली.
२३ मार्च २०२० रोजी कोरोना महामारीने सर्वत्र शिरकाव केल्यानंतर या काळातही जिल्हा आरोग्य विभागाने क्षयरोग शोधमोहीम सुरूच ठेवली होती. या क्षयरोग शोधमोहिमेअंतर्गत क्षयरोग विभागाला ११५० रुग्ण शोधण्यात यश आले. जिल्ह्यासाठी १७०० एवढे उद्दिष्ट देण्यात आले होते. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांमध्ये क्षयरोग शोधमोहीम राबविली गेली. जिल्ह्यातील ७११ गावांमध्ये जीवाची पर्वा न करता वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांनी प्रयत्न करून ११५० रुग्ण शोधून काढले. क्षयरोग शोधमोहीम हा कार्यक्रम दरवर्षी जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये राबविला जात आहे. एवढेच काय आरोग्य विभागाच्या वतीने गावागावांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृतीही केली जाते.
क्षयरोग हा दुर्धर आजार आहे, असा समज आहे. परंतु वेळेवर आणि संपूर्ण औषधोपचार घेतल्यास तो पूर्णपणे बरा होतो, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी रुग्णाने तसेच त्याच्या नातेवाईकांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, आपल्या थुंकीचे नमुने शोध मोहिमेदरम्यान आलेल्या कर्मचाऱ्यांना द्यावे. जेणेकरुन आजार कोणता आहे, हे समजण्याचा मार्ग सुकर होईल. आजारी व्यक्तीने दिलेले थुंकीचे नमुने सूक्ष्मदर्शी यंत्राद्वारे तपासले जातील. यासाठी गावोगावी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
क्षयरोग दिनी मास्कचे वाटप
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ज्या सूचना दिल्या आहेत. त्या सुचनांचे पालन करत मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील बसस्थानक, रेल्वे स्टेशन, गांधी चौक, खटकाळी बायपास, अकोला बायपास अशा ठिकाणी जिल्हा क्षयरोग विभागाच्या वतीने सर्वसामान्य जनतेला मास्कचे वाटप केले जाणार आहे.
- डॉ. राहुल गिते, जिल्हा क्षयरोग अधिकारी, हिंगोली