जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचावरच न्याय मागण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:26 IST2021-03-07T04:26:56+5:302021-03-07T04:26:56+5:30

आपल्या न्याय हक्कासाठी आता प्रत्येक नागरिक जागरूक झाला आहे. त्यामुळे फसवणूक होणार नाही, याची काळजी घेत आहे. तरीही जास्त ...

Time to seek justice at the District Consumer Grievance Redressal Forum | जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचावरच न्याय मागण्याची वेळ

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचावरच न्याय मागण्याची वेळ

आपल्या न्याय हक्कासाठी आता प्रत्येक नागरिक जागरूक झाला आहे. त्यामुळे फसवणूक होणार नाही, याची काळजी घेत आहे. तरीही जास्त नफा मिळविण्याच्या नादात काही विक्रेता, पुरवठादारांकडून ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे असे ग्राहक न्याय हक्कासाठी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घेत आहेत. त्यामुळे ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रारीचा आकडा वाढत आहे. मागील दोन वर्षांत ८८० तक्रारी ग्राहक मंचाकडे आल्या आहेत. मात्र त्या तुलनेत तक्रारी निकाली काढण्याचे प्रमाण कमी आहे. याबाबत आढावा घेतला असता येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचातील काही पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे यातील अध्यक्षाचा पदभारही वाशिम येथील अध्यक्षाकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे दोन्हीकडील पदभार पाहताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सदस्याचे एक पद भरलेले असले तरी एक पद रिक्त आहे. शिवाय प्रबंधक, सहायक लेखा, अभिलेखापाल, उच्चश्रेणी लघुलेखक कर्मचाऱ्यांची पदेही रिक्त आहेत. लिपिकाचे एक पद भरले असून, एक पद रिक्त आहे. केवळ शिरस्तेदार, सहाय्यक अधीक्षक, निम्नश्रेणी लघुलेखक या पदांसह मानधन तत्त्वावर शिपाईचे दोन पदे भरलेली असल्याची माहितीही शिरस्तेदार बी. सी. सोळुके यांनी दिली.

ग्राहकांचा वाढला विश्वास

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडून वेळोवेळी जनजागृती केली जात असल्याने ग्राहक न्याय हक्कासाठी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घेत आहे. तसेच तक्रारी लवकर निकाली निघत असल्याने ग्राहकांचा विश्वास वाढला आहे. मात्र रिक्त पदांमुळे यावर मर्यादा येत असल्याचे चित्र आहे. येथील रिक्त पदे भरल्यास तक्रारी निकाली काढण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे.

Web Title: Time to seek justice at the District Consumer Grievance Redressal Forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.