शाळेत जाणाऱ्या मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीस तीन वर्षांचा सश्रम कारावास
वसमत : घरून शाळेत जाण्यासाठी निघालेल्या मुलीची छेड काढून विनयभंग करणाऱ्या आरोपीस ३ वर्षांचा सश्रम कारावास व चार हजारांचा दंड ठोठावण्यात आला. वसमत येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने २९ ऑगस्टला हा निकाल सुनावला.
औंढा नानागथ तालुक्यातील पिंपरी कुंडकर येथे ३० सप्टेंबर २०१५ रोजी सकाळी ८:३० वाजता मुलगी शाळेला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. ती रस्त्याने जात असताना तिचा वाईट हेतून उजवा हात धरून छेड काढल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी १ ऑक्टोबर २०१५ रोजी बासंबा पोलिस ठाण्यात लक्ष्मण प्रल्हाद खाडे (रा. पिंपरी कुंडकर, ता. औंढा) यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक पी. डी. भुते यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
या प्रकरणाची सुनावणी वसमत न्यायालयात झाली. त्यात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. एन. राजे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. मुलगी शाळेत जात असताना ही घटना घडली असून, आरोपीने तिचा विनयभंग केल्याचे साक्ष व पुराव्यांवरून सिद्ध झाले. त्यावरून आरोपी लक्ष्मण प्रल्हाद खाडे यास ३ वर्ष सश्रम कारावास व ४ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता संतोष के.दासरे यांनी बाजू मांडली.
Web Title: Three years rigorous imprisonment for the accused who molested the girl