हिंगोली जिल्ह्यात वरपूडकर गटाला तीन जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:28 IST2021-03-24T04:28:07+5:302021-03-24T04:28:07+5:30
परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार सुरेश वरपूडकर यांच्या गटाला ११ जागा मिळाल्या असून, माजी आ. ...

हिंगोली जिल्ह्यात वरपूडकर गटाला तीन जागा
परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार सुरेश वरपूडकर यांच्या गटाला ११ जागा मिळाल्या असून, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटाला नऊ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. हिंगोली जिल्ह्यात वरपूडकर गटाला तीन जागा मिळाल्या.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीअंतर्गत १४ जागांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. त्यामध्ये वरपूडकर गटाला ८ जागा मिळाल्या. त्यामध्ये परभणी गटातून आमदार सुरेश वरपूडकर यांनी दत्ता गोंधळकर यांचा ८१ मतांनी पराभव केला. वरपूडकर यांना ८७, तर गोंधळकर यांचा ६ मते पडली. सोनपेठ गटात अटीतटीची लढत झाली. येथे माजी जि. प. अध्यक्ष राजेश विटेकर यांनी गंगाधर कदम बोर्डीकर यांचा एका मताने पराभव केला. विटेकर यांना १९, तर बोर्डीकर यांना १८ मते मिळाली. औंढा नागनाथ गटातून राजेश पाटील गोरेगावकर विजयी झाले. त्यांना ३४ तर विरोधातील शेषराव कदम यांना २८ मते मिळाली. वसमत गटातून आमदार राजू नवघरे यांनी सविता नादरे यांचा पराभव केला. नवघरे यांचा ६७ तर नादरे यांना ९ मते मिळाली. कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया गटात माजी आमदार सुरेश देशमुख यांनी बालासाहेब निरस यांचा पराभव केला. देशमुख यांना ४३, तर निरस यांना २७ मते मिळाली. अनुसूचित जाती, जमाती गटातून शिवसेनेचे अतुल सरोदे यांनी भाजपचे शिवाजी मव्हाळे यांचा पराभव केला. सरोदे यांना ८४३, तर मव्हाळे यांना ६८५ मते मिळाली. इतर मागासप्रवर्ग गटातून परभणीचे उपमहापौर भगवान वाघमारे यांनी प्रल्हाद चिंचाणे यांचा पराभव केला. चिंचाणे यांना ७१६, तर वाघमारे यांना ८१३ मते मिळाली. महिला प्रतिनिधी गटातून प्रेरणा वरपूडकर यांनी विद्या चौधरी यांचा पराभव केला. वरपूडकर यांना ८५७, तर चौधरी यांना ५५९ मते मिळाली. बोर्डीकर गटाने ५ जागांवर विजय मिळविला. त्यात सेलू गटातून आमदार मेघना बोर्डीकर यांनी वर्षा लहाने यांचा पराभव केला. बोर्डीकर यांना ३३, तर लहाने यांना १५ मते मिळाली. कळमनुरी गटातून माजी खासदार शिवाजी माने यांनी सुरेश वडगावकर यांचा पराभव केला. माने यांना ४६, तर वडगावकर यांना ३९ मते मिळाली. इतर शेती संस्था गटातून भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांनी विजय जामकर यांचा पराभव केला. जामकर यांना २४३, तर भरोसे यांना २६५ मते मिळाली. महिला प्रतिनिधी गटातून भावना कदम बोर्डीकर यांनी रूपाली राजेश पाटील गोरेगावकर यांचा पराभव केला. बोर्डीकर यांना ८४५, तर गोरेगावकर यांना ६९९ मते मिळाली.
जिल्ह्यातून दिग्गजांना संधी
हिंगोली जिल्ह्यातून वरपूडकर गटाला तीन, तर बोर्डीकर गटाला दोन जागा मिळाल्या. निवडून आलेल्यांत दोन आमदार, एक माजी आमदार व खासदार तर एक माजी जि. प. अध्यक्ष आहेत. कळमनुरीत मात्र माजी खा. माने यांनी अनपेक्षित मुसंडी मारली असून सेना व काँग्रेसनेही त्यांना ढिल देत दुटप्पी भूमिका ठेवणाऱ्यांना दूर लोटल्याचे दिसते.
एका घरातील तीनपैकी दोन विजयी
माजी आ.साहेबराव पाटील गोरेगावकर आधीच बिनविरोध आले होते. मुलगा राजेश पाटील यांनीही औंढ्यातून बाजी मारली. मतदारसंघ बदलून त्यांनी हे यश मिळविले. मात्र सून रुपाली पाटील या महिला प्रतिनिधी मतदारसंघातून पराभूत झाल्या.
असली शिवसैनिकाचा विजय
कळमनुरीतून विजयी झालेल्या माजी खा.शिवाजी माने यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, या निवडणुकीत मतदारांनी असली शिवसैनिक कोण? व नकली कोण? हे दाखवून दिले. मतदारांचा विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करील.
नवघरे एकतर्फी विजयी
वसमतमधून आमदार राजू नवघरे यांनी एकतर्फी विजय मिळविला. या ठिकाणी त्यांना विरोध असल्याच्या वावड्या उठत होत्या. मात्र यापूर्वीचे संचालक आंबादास भोसले यांच्यासमवेत त्यांनी सत्कार स्वीकारल्याने यातच सगळे आले.