एटीएममधील रक्कम लांबविणारे चोरटे निघाले हरयाणा राज्यातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:20 AM2021-06-23T04:20:05+5:302021-06-23T04:20:05+5:30

शहरातील देवडा नगर, शिवाजी नगर व नवीन मोंढा येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये छेडछाड करून त्यातील ४६ हजार ५०० ...

Thieves steal money from ATMs in Haryana | एटीएममधील रक्कम लांबविणारे चोरटे निघाले हरयाणा राज्यातील

एटीएममधील रक्कम लांबविणारे चोरटे निघाले हरयाणा राज्यातील

Next

शहरातील देवडा नगर, शिवाजी नगर व नवीन मोंढा येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये छेडछाड करून त्यातील ४६ हजार ५०० रुपयांची रक्कम लांबविल्याप्रकरणी १९ जून रोजी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे, साहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना हिंगोली शहर पोलिसांना दिल्या होत्या. त्यावरून पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांनी त्यांच्या पथकाला कामाला लावले. पोलिसांनी एटीएममधील सीसीटीव्ही फूटेज तपासले. या वेळी तीन ते चार जणांनी एटीएममध्ये छेडछाड केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी शहरातील लॉजमध्येही शोध घेऊन सीसीटीव्ही फूटेजची पाहणी केली. या वेळी एटीएममधील सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसणारी व्यक्ती एका लॉजमधील सीसीटीव्ही फूटेजमध्ये आढळून आली. अधिक तपास केला असता जावेद अली (रा. पलवल, हरयाणा) याच्या नावे १७ जून रोजी एक रूम बुक असल्याचे समजले. त्याने लॉजमध्ये दिलेल्या मोबाइल नंबरच्या लोकेशनवरून त्याला अकोला बायपास भागातून ताब्यात घेण्यात आले. त्याला विचारपूस केली असता गुन्ह्याची कबुली दिली. तसेच यात गारमाळ येथील सलीम प्यारेवाले तसेच अन्य दोघे हरयाणा राज्यातील असल्याचे सांगितले. पोलिसांनी सलीम प्यारेवाले याला जालना येथून अटक केली असून, दोघांकडून १० हजार ४०० रुपयांची रक्कम जप्त केली आहे.

हिंगोलीतील चोरीनंतर परभणीतील एटीएममध्ये केली चोरी

हिंगोली शहरातील तीन एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून पैसे लांबविल्यानंतर चोरट्यांनी परभणीतील दोन एटीएममधील पैसे लांबविल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच चोरीतील पैसे वाटून घेत वेगवेगळ्या दिशांना निघून गेले. मात्र लॉजमध्ये दिलेल्या मोबाइल नंबरमुळे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात अलगद सापडले. चोरटे हरयाणा राज्यातील असल्याने अशा गुन्ह्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सायबर सेलने बजावली महत्त्वाची भूमिका

एटीएममध्ये चोरी करणाऱ्यांचा शोध घेण्यात सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. मोबाइल लाेकेशन अचूक काढल्याने चोरटा अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला. चोरीचा तपास करणाऱ्या पथकात पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, उपनिरीक्षक प्रकाश कांबळे, पोलीस हवालदार शेख शकील, शेख मुजीब, सुधीर ढेंबरे, गजानन होळकर, उमेश जाधव, असलम गारवे, पोलीस शिपाई गणेश लेकूळे, दिलीप बांगर, सायबर सेलचे जयप्रकाश झाडे, मुदीराज आदींचा समावेश होता.

फोटो : ०२

Web Title: Thieves steal money from ATMs in Haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.