टोपीवाल्या चोरांनी सराफाला घातली टोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:25 IST2021-01-14T04:25:05+5:302021-01-14T04:25:05+5:30
वसमत : टोपी व मास्क घालून सराफा दुकानात ग्राहक बनून आलेल्या चोरट्यांनी सराफा व्यापाऱ्याला टोपी घालण्याचा प्रकार सोमवारी घडला ...

टोपीवाल्या चोरांनी सराफाला घातली टोपी
वसमत : टोपी व मास्क घालून सराफा दुकानात ग्राहक बनून आलेल्या चोरट्यांनी सराफा व्यापाऱ्याला टोपी घालण्याचा प्रकार सोमवारी घडला होता. या प्रकरणातील चोरट्यांच्या तपासासाठी वसमत शहर व एलसीबीचे पथक तैनात करण्यात आले आहे. कुरूंदा व वसमत प्रकरणातील चोरटे एकच असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट होत आहे.
वसमत येथील सराफा व्यापारी शशीकुमार कुल्थे यांच्या दुकानातील साडे पंधरा ग्रॅम सोन्यांचे दागिने हातचलाखीने लांबविण्याची घटना सोमवारी दुपारी घडली. घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये झाले आहे. यात सुटाबुटातील सभ्य दिसणाऱ्या दोन व्यक्ती तोंडाला मास्क बांधलेल्या आहेत. टोपी घातलेले दोन जन स्पष्ट दिसत आहेत. वसमत येथे घटना घडल्यानंतर लगेच हे चोरटे कुरूंदा येथे दुचाकीवरून गेले. तेथील व्यापाऱ्याचे दोन लाख रुपये लांबवले. कुरूंदा आणि वसमत येथील चित्रीकरण पाहता दोन्ही घटनातील चोरटे एकच असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय व त्यांच्या पथकाने वसमत व कुरुंदा येथे भेट देऊन तपास सुरू केला आहे. सराईत चोरांची ही टोळी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. हातचलाखीने चोरी करणे, अधिकारी असल्याचे भासवून लुबाडणूक करणे अशी कार्यपद्धती या चोरट्यांची असल्याचा निष्कर्ष करण्यात येत आहे. अशा पद्धतीने चोऱ्या करणाऱ्यांचा शोध सुरू झाला आहे.
स्थागुशाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्याशी संपर्क साधला असता, या दोन्ही घटनांचा तपास निश्चित लागेल. चोरट्यांच्या शोधार्थ पथक तैनात करण्यात आले असून, खबऱ्यांकडूनही माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.