नववसाहतीत पाणी आले, रस्ते होईनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:15 IST2020-12-28T04:15:59+5:302020-12-28T04:15:59+5:30
हिंगोली शहराच्या आजूबाजूला असलेली शेती आता अकृषिक होत असून मोठ्या प्रमाणात नवीन वसाहती उभारल्या जात आहेत. काही भाग ग्रामीण ...

नववसाहतीत पाणी आले, रस्ते होईनात
हिंगोली शहराच्या आजूबाजूला असलेली शेती आता अकृषिक होत असून मोठ्या प्रमाणात नवीन वसाहती उभारल्या जात आहेत. काही भाग ग्रामीण क्षेत्रात येत असल्या तरीही शहरी भागात मोडणाऱ्या वसाहतींचीही बोंब कायम आहे. रस्ते, पाणी, विजेचे खांब आदींसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही वसाहतींमध्ये नगरपालिकेने पाण्याची व्यवस्था केली. ही एक बाब सोडली तर अनेक वसाहतींना रस्त्यांचा प्रश्न मात्र सतावत आहे. अशा वसाहतींपैकी काही ठिकाणचे रस्ते ठोक अनुदानात मंजूर झाले. मात्र, काही भागांतील रस्त्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नवीन लेआऊट पडल्यानंतर त्यातील सुविधांचा कोणीच आढावा घेत नाही. मात्र, अशा ठिकाणी भूखंड खरेदी करून निवासी व्यवस्थेला जाणारे नागरिक नंतर या सुविधेसाठी पालिकेच्या नावाने बोटे मोडतात. पालिकाही अशा भागातील करवसुली सुरू करते. मात्र, सर्व सुविधा एकाचवेळी देणे शक्य नसल्याचे सांगून वेळकाढू धोरण अवलंबते. शहरातील जवळपास २० ते २५ नव्या वसाहती यात पिचल्या जात आहेत.
रस्ते, वीज, पाण्याच्या समस्या कायमच
हिंगोली : शहरातील कमलानगर, शाहूनगर, ज्योतीनगर, इंदिरानगर, रामकृष्णा टाऊन, आंबेडकरनगर, तिरुपतीनगर, साईनगर आदी नगरांत अनेक वर्षांपासून रस्ते, नाल्या, पाणी या समस्या कायमच आहेत. अनेकवेळा विनंती, अर्ज करुनही त्या सोडविल्या जात नाहीत. या नगरांमध्ये नाल्या नसल्यामुळे पाणी रस्त्यांवर येत आहे. काही ठिकाणी रस्ते व नाल्या अर्धवट स्थितीत करुन ठेवल्या आहेत. रस्ते, वीज, पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रफुल्ल सूर्यवंशी, आशिष लोकडे, सय्यद तय्यब, ज्योतीपाल रणवीर, आशिष इंगळे यांनी केली आहे.
हिंगोली : शहरातील आंबेडकर नगरामध्ये दहा वर्षांपासून साेईसुविधा नागरिकांना मिळत नाहीत. पाणी, रस्ते, वीज ही समस्या जटिल होऊन बसली आहे. या नगरातील रस्ते जागोजागी उखडले आहेत. नाल्या बांधलेल्या नाहीत. पिण्याचे पाणी नागरिकांना मिळत नाही. तसेच अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले आहेत.
- राहुल खिल्लारे
हिंगोली : शहरातील रामकृष्णा टाऊन या नगरात रस्ते, पाणी, वीज ही समस्या चांगलीच भेडसावत आहे. या नगरामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे लोकसंख्या आहे. परंतु, त्यामानाने कोणतीच सुविधा येथे दिसत नाही. पाईपलाईन टाकणे गरजेेचे असताना विनंती, अर्ज करुनही ती टाकलेली नाही. नाल्यांचीही समस्या कायमच आहे.
- सुनिता दराडे
हिंगोली : शहरातील कमलानगर, शाहूनगर, ज्योतीनगर, इंदिरानगर, रामकृष्णटाऊन, आंबेडकरनगर, तिरुपतीनगर, साईनगर हा भाग गुंठेवारी क्षेत्रात येतो. शासनाच्या निधी प्राप्तीनुसार याठिकाणी सोयी-सुविधा केल्या जातात. यासाठी नगर परिषदेचे पदाधिकारी हे विविध विकासकामासंदर्भात ठराव घेतात. सध्यातरी यासाठी तरतूद करण्यात आलेली नाही.
-डाॅ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी, न. प. हिगोली