जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा धोका नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:18 IST2021-01-13T05:18:16+5:302021-01-13T05:18:16+5:30
हिंगोली : जिल्ह्यात मोठे धरण नसल्यामुळे विदेशी पक्षी येत नाहीत. त्यामुळे ‘बर्ड फ्लू’चा धोका नाही. विशेष म्हणजे एकही पक्षी ...

जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा धोका नाही
हिंगोली : जिल्ह्यात मोठे धरण नसल्यामुळे विदेशी पक्षी येत नाहीत. त्यामुळे ‘बर्ड फ्लू’चा धोका नाही. विशेष म्हणजे एकही पक्षी आजपर्यंत मृत पावलेला नाही. यामुळे सध्यातरी ‘बर्ड फ्लू’चा धाेका नसल्याचे पशुसंवर्धन जिल्हा उपायुक्त लक्ष्मण पवार यांनी सांगितले.
जिल्ह्यातील बासंबा येथे सुभाष निरगुडे यांच्याकडेच एक पोल्ट्री फार्म आहे. तेथील कोंबड्याही सुरक्षित आहेत. हिंगोली जिल्हा हा छोटा असून जिल्ह्यात कुठेही मोठे धरण नाही. त्यामुळे विदेशी पक्षी येण्याचा प्रश्नच नाही. विदेशी पक्षी ज्या ठिकाणी येतात. तेथे ‘बर्ड फ्लू’सारखे आजार उद्भवण्याचे मोठे कारण असते.
कोरोना आजारानंतर ‘बर्ड फ्लू’सारख्या आजाराने राज्यात डोके वर काढले आहे.
जिल्ह्यात कोरोना आजाराचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. त्यातच आता ‘बर्ड फ्लू’ची साथ पसरली आहे. त्यामुळे नागरिकांनी धास्ती घेतली होती. परंतु, ‘बर्ड फ्लू’चा हिंगोली जिल्ह्यात काही परिणाम झालेला दिसून येत नाही. शहरात जवळपास पन्नास ते साठ चिकन सेंटर सद्य:स्थितीत अस्तित्वात आहेत. कोंबडीची अंडी पूर्वी ७ रुपयाला एक याप्रमाणे विकली जात होती. आता ६ रुपयाला एक याप्रमाणे विक्री करीत असल्याचे शेख अल्ताफ यांनी सांगितले.
पशुसंवर्धन विभागाकडून अशी घेतली जाते काळजी
n हिंगोली जिल्ह्यात आजमितीस तरी ‘बर्ड फ्लू’चा धोका नाही. ज्या शेतकऱ्यांची किंवा पोल्ट्री फार्म व्यवसाय करणाऱ्यांच्या कोंबड्या मृत पावत असतील तर त्यांनी उशीर न लावता पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वेळोवेळी करण्यात आले आहे. अर्ज आल्यास वेळीच त्यांच्यापर्यंत पथक पाठवून औषधोपचार केला जातो.
आजमितीस तरी हिंगोली जिल्ह्यात बर्ड फ्लू हा आजार नाही. त्यामुळे चिंता करण्याचे काही कारण नाही. पक्ष्यांची योग्यरितीने काळजी घेतली जात आहे.
- डाॅ. लक्ष्मण पवार, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन, हिंगोली
मृत पक्षी आढळल्यास तत्काळ कळवा
जिल्ह्यातील बासंबा येथे एकाच ठिकाणी पोल्ट्री फार्म आहे. दुसरीकडे कोठेही पोल्ट्री फार्म नाही. पोल्ट्री चालक किंवा शेतकऱ्यांच्या पशु, पक्ष्यांना काही आजार असेल तर त्यांनी लगेच जिल्हा पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशु संवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.