' ई - पास ' साठी कारणं तीनच ; लग्न, रूग्णालय किंवा अंत्यसंस्कार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:48 IST2021-05-05T04:48:57+5:302021-05-05T04:48:57+5:30

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. या काळात अत्यावश्यक सेवा किंवा अत्यंत निकडीच्या कामासाठी ...

There are only three reasons for e-pass; Wedding, hospital or funeral! | ' ई - पास ' साठी कारणं तीनच ; लग्न, रूग्णालय किंवा अंत्यसंस्कार !

' ई - पास ' साठी कारणं तीनच ; लग्न, रूग्णालय किंवा अंत्यसंस्कार !

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. या काळात अत्यावश्यक सेवा किंवा अत्यंत निकडीच्या कामासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून जिल्ह्याबाहेर खाजगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांना ई-पास देण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत १ हजार ३७८ जणांनी ई - पासचा लाभ घेतला आहे. ई- पास घेणाऱ्यांनी रूग्णालय, लग्न, अंत्यसंस्कार ही कारणे सांगितली आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. खासगी प्रवासी वाहनांना जिल्ह्याबाहेर अथवा जिल्ह्यात येण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवेसाठी ये-जा करणाऱ्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे. परंतु, वाहन क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी बसविता येणार आहेत. ई-पास साठी https://covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात ई-पास देण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश शेळके, पोलीस कर्मचारी युवराज वाघमारे, दतात्रय संगेकर यांचे पथक अर्ज तत्काळ निकाली काढण्यासाठी पुढाकार घेत आहे. हिंगोली जिल्ह्यातून आतापर्यंत २ हजार २८४ जणांनी ई-पास साठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. मात्र अर्जात अपुरी माहिती भरणे, दुसऱ्यांदा अर्ज करणे, प्रवास करण्यासाठी सबळ कारणाचा उल्लेख न करणे आदी कारणामुळे ८७१ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. तर आतापर्यंत १ हजार ३७८ जणांना पास देण्यात आला आहे. तसेच ५५९ जणांच्या पासचा कालावधी पूर्ण झाला आहे. पात्र एकही अर्ज प्रलंबित ठेवला जात नसल्याची माहिती या कक्षातून देण्यात आली.

......................

ई- पाससाठी असा करावा अर्ज

ई-पास मिळविण्यासाठी https://covid19.mhpolice.in ही लिंक उघडून अर्जासाठी अप्लाय करावे.त्यानंतर जिल्ह्याचे नाव, आपले नाव, कुठून कुठपर्यंतचे प्रवासाचे ठिकाण, मोबाईल नंबर, प्रवासाचे कारण, प्रवासाचा उद्देश, वाहनाचा प्रकार, वाहन क्रमांक, वर्तमान पत्ता, ई मेलचा पत्ता, प्रवाशांची संख्या, प्रवास संपेल तो पत्ता आदी माहिती भरावी. तसेच कंटेन्मेंट झोनमध्ये आहात किंवा नाही याची माहिती भरावी लागणार आहे.

............

ही कागदपत्रे हवीत

वैद्यकीय प्रमाणपत्र, प्रवाशांची आरटीपीसीआर, रॅपिड अँटिजेन रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचा अहवाल, आधार कार्ड आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

...........................

काही वेळातच मिळतो ई-पास

ई-पास साठी अर्ज केल्यावर अर्जदाराला एक टोकन क्रमांक मिळतो. काही वेळातच लिंकवर ई-पास डाऊनलोड असणाऱ्या विकल्पावर जाऊन टाेकन क्रमांक टाकून ऑनलाइन ई-पास डाऊनलोड करता येतो. प्रवासाच्या दरम्यानही ई-पास असणे आवश्यक आहे. ई-पासचा दुरुपयोग केल्याचे आढळल्यास कारवाई किंवा १० हजार रुपये दंड केला जाऊ शकतो.

..........

तीच ती कारणे

ई-पास काढण्यासाठी सबळ कारणे द्यावी लागतात. हिंगोली जिल्ह्यात १ हजार ३७८ जणांना पास देण्यात आला आहे. यात रुग्णाला उपचारासाठी नेणे, नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी जाणे ही दोन महत्त्वाची कारणे नमूद केली आहेत. तसेच काही पासेसमध्ये लग्न, गंभीर आजाराच्या कारणाचा उल्लेख केला आहे.

आठ दिवसांत किती आले अर्ज - १०००

आतापर्यंत दिले ई-पास - १३७८

प्रलंबित - ३५

Web Title: There are only three reasons for e-pass; Wedding, hospital or funeral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.