पनवेल येथे मायलेकीची हत्या करून फरार झालेल्या आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 18:40 IST2021-02-21T18:39:59+5:302021-02-21T18:40:16+5:30
पनवेल येथे मायलेकीची हत्या करून फरार झालेल्या तरुणाने हिंगोली तालुक्यातील वैजापूर शिवारामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.

पनवेल येथे मायलेकीची हत्या करून फरार झालेल्या आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या
नर्सी नामदेव (जि. हिंगाेली) : पनवेल येथे मायलेकीची हत्या करून फरार झालेल्या तरुणाने हिंगोली तालुक्यातील वैजापूर शिवारामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. पनवेल येथे लग्न करण्यास नकार दिल्याने सुरेखा बलखंडे व सुजाता बलखंडे या माय लेकीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी घडली होती. या घटनेनंतर आरोपी प्रकाश यशवंता मोरे वय २६ रा. पहेनी ता. जि. हिंगोली हा घटनास्थळावरून फरार होत, आपल्या मूळगावी पहेनी शिवारामध्ये लपून बसला होता. खून प्रकरणी मुंबई पोलिसांचे पथक आरोपींचा शोध घेत पहेनी शिवारामध्ये आरोपीच्या मागावर फिरत होते. परंतु रविवारी ३ वाजताच्या सुमारास या आरोपीने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
सिद्धार्थ बलखंडे रा. रुपूर ता. कळमनुरी जिल्हा हिंगोली हे दापत्य काही वर्षांपासून पनवेल येथे कंपनीमध्ये काम करण्यासाठी गेले होते. सदरील मयत सुद्धा पनवेल याठिकाणी टिप्पर चालकाचे काम करीत असे, मयत व बलखंडे दाम्पत्य दापोली येथील एकाच चाळीत राहत होते. दोघेही हिंगोली जिल्ह्यातील असल्याने एकमेकांना ओळखत असत. याच दरम्यान मयत प्रकाशने सुजाता बलखंडे हिस लग्नाची मागणी घातली होती. तसेच काही दिवसांपासून वारंवार लग्न करण्यासाठी तगादा लावत हाेता. परंतु प्रकाशचे पहिले लग्न होऊन पत्नी बाळंतपणामध्ये मृत्यू झाल्याने सिद्धार्थ बलखंडे यांनी लग्नास नकार दिला. १८ फेब्रुवारी रोजी प्रकाशने लग्नाचा विषय काढला व यावेळीसुद्धा मुलीच्या वडीलाने लग्नास नकार दिल्याने प्रकाशने रागाच्या भरात धारदार शस्त्राने बलखंडे दापत्यांवर हल्ला केला. यामध्ये मायलेकीचा जागीच मृत्यू झाला तर वडीलास गंभीर दुखापत झाली होती. हत्या करून प्रकाश हा घटनास्थळावरून फरार होऊन आपल्या मूळगावी पहेनी शिवारामध्ये दडून बसला होता. परंतु रविवारी वैजापूर शिवारामध्ये माळरानावर लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच नर्सी पोलीस ठाण्याचे कर्मचारी व मुंबई पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते.