सणानिमित्त माहेरी आलेल्या नवविवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 18:30 IST2019-07-13T18:28:48+5:302019-07-13T18:30:37+5:30
दीड महिन्यापूर्वीच झाले होते लग्न

सणानिमित्त माहेरी आलेल्या नवविवाहितेची आत्महत्या
आखाडा बाळापूर (हिंगोली ) : पेठवडगाव येथील एक नवविवाहिता आखाड सणासाठी माहेरी आली होती. शनिवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.
याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील पेठवडगाव येथील जयश्री प्रशांत खोकले (वय 20 वर्ष, राहणार भोकर ,जिल्हा नांदेड ) हीचे दीड महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. आखाड सणानिमित्त ती शुक्रवारी पेठवडगाव येथील माहेरी आली. आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी धनराज मधुकरराव भोसीकर (वय 36) यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार गणेश राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अच्युत मुपडे , बीटजमादार दादाराव सूर्य, एन. आर. बाभळे करत आहेत.