बांगर यांच्या मागणीनंतर अतिवृष्टीच्या सर्वेक्षणाच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:36 IST2021-09-09T04:36:21+5:302021-09-09T04:36:21+5:30
जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे हाती आलेले उडीद, मुगाचे पीक नुकसानीच्या पातळीवर आले आहे. ...

बांगर यांच्या मागणीनंतर अतिवृष्टीच्या सर्वेक्षणाच्या सूचना
जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे हाती आलेले उडीद, मुगाचे पीक नुकसानीच्या पातळीवर आले आहे. याशिवाय सोयाबीन कापूस व ज्वारी या पिकांना ही पावसाचा मोठा फटका बसला आहे. यासोबतच वारंगा, डोंगरकडा मंडळांमध्ये सर्वात जास्त पाऊस झाला. यामुळे इतर पिकांसोबतच हळद व ऊस पिकाचेही नुकसान झाले आहे.
या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने शेतात पाणी जाऊन पिकांना मोठा फटका बसला आहे. कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यामध्ये कळमनुरी मंडळात वाकोडी ६७.८ मिलीमीटर, नांदापूर ५३. ८ मिलीमीटर, आखाडा बाळापूर ९१.१ मिलीमीटर, डोंगरकडा १०८.८ मिलीमीटर वारंगा १३१ मिलीमीटर, औंढा नागनाथ ९२.७ मिलीमीटर, येहळेगाव ६८.३ मिलीमीटर, साळणा ६९.५ मिलीमीटर तर जवळा बाजार मंडळात ७९.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील बहुतांश गावांमधून शेतकऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाल्याचे आमदार बांगर यांना सांगितले.
त्यानंतर आमदार बांगर यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याशी संपर्क साधून कळमनुरी विधानसभा मतदार संघासह जिल्हाभरात झालेल्या नुकसानीची माहिती दिली. अतिवृष्टी झालेल्या सर्व गावांमध्ये नुकसानीचे तातडीने वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून शासनाला अहवाल सादर करावा अशी मागणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी पापळकर यांनी महसूल यंत्रणा तातडीने पंचनामे करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.