बोगस डॉक्टर शोधासाठी समित्यांना सक्रियतेसाठी सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:35 IST2021-09-04T04:35:36+5:302021-09-04T04:35:36+5:30
कोरोनाच्या काळात अनेक गावांमध्ये नवीन मुन्नाभाई अवतरले आहेत. तर काही ठिकाणी अनेक वर्षांपासून फिरते बोगस डॉक्टर काम करतात; मात्र ...

बोगस डॉक्टर शोधासाठी समित्यांना सक्रियतेसाठी सूचना
कोरोनाच्या काळात अनेक गावांमध्ये नवीन मुन्नाभाई अवतरले आहेत. तर काही ठिकाणी अनेक वर्षांपासून फिरते बोगस डॉक्टर काम करतात; मात्र गावसंबंधांमुळे अशांची कोणी तक्रार करीत नाही. अशा डॉक्टरांबाबत तक्रार आल्याशिवाय समिती स्वत: कारवाई करीत नाही. एवढेच काय तर बोगस डॉक्टरांवर कारवाई करतानाच दबाव येत असल्याचीही उदाहरणे आहेत; मात्र तरीही या प्रकाराला आळा घालण्यासाठी फारसा प्रयत्न होत नाही. गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस अधिकारी, तहसीलदार अशा अनेकांचा या समितीत समावेश आहे. एवढी सगळी मंडळी यात लक्षही घालत नाही. त्याचा परिणाम म्हणून बोगस डॉक्टरांचे फावते. प्रत्येक तालुक्यात हेच चित्र आहे. तालुकास्तरीय समित्या सक्रिय झाल्या तरच कारवाई होऊ शकते.
याबाबत लोकमतमधूनही वृत्त प्रकाशित झाले होते. यानंतर आरोग्य विभागाला जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना देत या समितीची बैठक आयोजित करण्यास सांगितले आहे. तशी बैठकही लवकरच होणार आहे; मात्र या समित्यांनी सक्रिय काम करण्याची सूचना देण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले. नागरिकांनीही अशा प्रकारचा डॉक्टर आपल्या भागात आढळल्यास आरोग्य विभागाला कळविल्यास ते सोयीस्कर ठरते, असेही ते म्हणाले.