किन्होळा येथे २ एकरांमधील उसाला आग; अडीच लाख रूपयांचे झाले नुकसान
By यशवंत भीमराव परांडकर | Updated: January 26, 2024 21:19 IST2024-01-26T21:18:26+5:302024-01-26T21:19:41+5:30
घटनेची माहिती मिळताच किन्होंळा सज्जाच्या तलाठी यू.बी. मैड यांनी सदरील नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला आहे.

किन्होळा येथे २ एकरांमधील उसाला आग; अडीच लाख रूपयांचे झाले नुकसान
बालय्या स्वामी, कौठा (जि. हिंगोली): वसमत तालुक्यातील किन्होळा शिवारातील दोन एकरांतील उभ्या उसाला शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत शेतकऱ्याचे जवळपास अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले. सदर घटना २६ जानेवारी रोजी दुपारी घडली.
किन्होळा येथील शेतात अचानक विजेचा शॉर्टसर्किट झाला असल्यामुळे ही आग लागण्याचे सांगण्यात येत आहे. खरीप हंगामात सोयाबीन, कापसाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आधीच चिंताग्रस्त आहे. त्यात आता दोन एकरांवरील ऊस पूर्णतः जळाल्यामुळे शेतकऱ्यावर पुन्हा रब्बी हंगामात मोठे संकट आले आहे.
किन्होळा शिवारात कलावतीबाई शंकरराव जिंतूरकर यांचे गट नंबर २२ मध्ये शेती आहे. त्यांनी त्या दोन एकरांवर उसाची लागवड केली होती. सदरील शेतातून विद्युत वाहिनीची तार गेली आहे. त्यात अचानक शॉर्टसर्किट झाल्याने उभ्या उसाला आग लागल्याचे शेतकऱ्याने सांगितले. दुपारी आग लागली आणि पाहता पाहता आगीने एकदम रौद्ररूप धारण केले. हे पाहून परिसरातील शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे आगीत ऊस जळून खाक झाला. सदरील घटनेची माहिती मिळताच किन्होंळा सज्जाच्या तलाठी यू.बी. मैड यांनी सदरील नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला आहे.
आगीमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने याची भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेजारील शेतकऱ्यांनी केली आहे.