डासांच्या उपद्रवातून सुटका; वसतिगृहासह निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना नवीन गादी, मच्छरदाणी
By यशवंत भीमराव परांडकर | Updated: February 17, 2025 11:23 IST2025-02-17T11:19:27+5:302025-02-17T11:23:00+5:30
राज्य शासनाने १६ कोटी ६७ लाख ५९ हजार ७२७ रुपये खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.

डासांच्या उपद्रवातून सुटका; वसतिगृहासह निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना नवीन गादी, मच्छरदाणी
हिंगोली : राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहे आणि निवासी शाळांमधील विद्यार्थी, विद्यार्थिनींना मच्छरदाणी, गादी, उशी आणि उशी कव्हर पुरवण्याचा निर्णय राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने १४ फेब्रुवारी २०२५ रोजी घेतला आहे.
शासकीय वसतिगृहे आणि शासकीय निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी गादी, उशी, उशी कव्हरसोबतच मच्छरदाणी खरेदी करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मागासवर्गीय मुला-मुलींच्या शिक्षणासाठी शासकीय वसतिगृहे तसेच शासकीय निवासी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शासकीय वसतिगृहे आणि निवासी शाळांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना विविध अत्यावश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गादी, उशी, उशी कव्हर यासह मच्छरदाणी या वस्तूंची खरेदी करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती. चारही वस्तूंच्या खरेदीसाठी राज्य शासनाने १६ कोटी ६७ लाख ५९ हजार ७२७ रुपये खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
या रकमेतून २३४०७ गाद्या, ३२०६५ उशा, ५९९०५ उशी कव्हर आणि ५००३७ मच्छरदाणी खरेदी करण्यात येतील. या चारही वस्तूंचा पुरवठा महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ (महाटेक्स), मुंबई आणि महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, नागपूर यांच्यामार्फत करण्यात येईल.
डासांच्या उपद्रवातून सुटका होणार...
पुरवठादाराकडून वस्तू मिळाल्यानंतर संबंधित गृहप्रमुख किंवा गृहपालांनी सदर पोचपावती ही समाजकल्याण आयुक्त, पुणे यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. मच्छरदाणी पुरवण्याच्या निर्णयामुळे वसतिगृहातील आणि निवासी शाळांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना डासांच्या उपद्रवातून सुटका होण्यास मदत मिळणार आहे.