सणासुदीच्या काळात तरी रेल्वेची ‘स्पेशल’ लूट थांबवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:35 IST2021-09-08T04:35:35+5:302021-09-08T04:35:35+5:30
हिंगोली : गत दीड-दोन वर्षांपासून पॅसेंजर रेल्वे सुरू नसल्यामुळे प्रवाशांना ‘स्पेशल’ रेल्वे गाडीने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे ...

सणासुदीच्या काळात तरी रेल्वेची ‘स्पेशल’ लूट थांबवा !
हिंगोली : गत दीड-दोन वर्षांपासून पॅसेंजर रेल्वे सुरू नसल्यामुळे प्रवाशांना ‘स्पेशल’ रेल्वे गाडीने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात तरी रेल्वे विभागाने पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करणे गरजेचे झाले आहे.
कोरोना महामारीमुळे २०१९ पासून रेल्वे विभागाने पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद केल्या आहेत. सद्यस्थितीत कोरोना महामारी कमी झाल्यामुळे दोन महिन्यांपूर्वी ‘डेमो’ रेल्वे गाडी प्रवाशांसाठी सुरू केली. परंतु, या गाडीचे भाडे मात्र एक्सप्रेसचे आहे. त्यामुळे हे भाडे सर्वसाधारण प्रवाशांना परवडणारे नाही. उलट ‘डेमो’ काही स्टेशनला थांबत पण नाही. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. अशावेळी रेल्वे विभागाने पॅसेंजर रेल्वे सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
सध्या सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन...
सध्या हिंगोली रेल्वे स्थानकावरून नरखेड ते काचीगुडा, अमरावती ते तिरुपती, कोल्हापूर ते नागपूर, नांदेड ते जम्मूतावी, नांदेड ते गंगानगर, पूर्णा ते अकोला आदी पाच ते सहा जवळपास रेल्वे सुरू आहेत. परंतु, या सर्व रेल्वे गाड्या एक्सप्रेसच आहेत. त्यामुळे जास्तीचे भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे.
दुप्पट भाडे कधीपर्यंत सहन करणार...
सद्यस्थितीत शासनाने अनलॉक केला तरी रेल्वे विभाग मात्र पॅसेंजर गाडी सुरू करण्याचे नाव घेत नाही. २० किलोमीटरला ३० रुपये असे दुप्पट भाडे देऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे. रेल्वे विभागाने याचा विचार करणे गरजेचे आहे.
जनरल डबे कधी ‘अनलॉक’ होणार...
हिंगोली येथून जवळपास पाच एक्सप्रेस गाड्या धावतात. परंतु, एकाही गाडीला सर्वसामान्यांसाठी जनरल डबा नाही. सर्वत्र व्यवहार अनलॉक झालेला असताना अजूनही जनरल डबे ‘लाॅक’च आहेत. सणासुदीच्या दिवसांमध्ये एखादा तरी जनरल डबा जोडावा.
‘स्पेशल’ भाडे कसे परवडणार..?
पोळा सणानंतर सर्व सण गोळा होऊ लागतात. त्यामुळे सणावाराला शहराच्या ठिकाणी खरेदीसाठी जावे लागते. अशावेळी खासगी वाहनचालकही दुप्पट भाडे घेत आहेत. प्रवास करावा की नाही, हाच मोठा प्रश्न आहे.
-गजानन वडाणकर, प्रवासी
रेल्वे विभाग पॅसेंजर गाड्याही सुरू करत नाही आणि एक्सप्रेस रेल्वेला जनरल डबाही जोडत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांनी प्रवास करावा की नाही, हे कळायला मार्ग नाही. रेल्वे विभागाने प्रवाशांची काळजी घेऊन जनरल डब्बा जोडावा.
-बालासाहेब कल्याणकर, प्रवासी
डमी ११४२