वसमत: बाजार समिती मोंढ्यातील एका व्यापाऱ्याने सोशल मिडियात केलेली आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली. त्यानंतर त्या व्यापाऱ्याच्या मोंढ्यातील दुकान व घरावर जमावाने दगडफेक केली. यावेळी जमावास शांत करणाऱ्या उपविभागीय पोलिस अधिकारी यांना देखील जीवे मारण्याची धमकी देत दगडफेक करण्यात आली. यात अधिकारी देखील जखमी झाले. याप्रकरणी १२ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वादग्रस्त पोस्ट व्हायरल करणारे व्यापारी कैलास काबरा याच्याविरुद्धही शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसमत बाजार समिती मोंढ्यातील व्यापाऱ्याने एपीएमसी व्हाट्सअप ग्रुपवर १५ डिसेंबर रोजी दुपारी १:२५ वाजेदरम्यान दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी वादग्रस्त पोस्ट सोशल मिडियात व्हायरल केली. त्यानंतर रात्री ८:३० ते १० वाजेदरम्यान मोढ्यातील त्या व्यापाऱ्याच्या दुकान व घरावर जमावाने दगडफेक केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे, फौजदार महाजन, फौजदार कसबेवाड,जमादार शेख हाकीम यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत जमावास शांत करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी जमावाने उपविभागीय पोलिस अधिकारी केंद्रे यांना काहींनी जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्यावर दगडफेक केली. यात अधिकारी जखमी झाले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्या फिर्यादीवरून शेख मोहसीन शेख हसन,खालीद अख्तर जमीर अहमद, शेख अरबाज शेख मेहमूद,शेख नदीम शेख मोईन, मोहम्मद शोएब मोहम्मद मकसूद, मुशर्रफ ताजुद्दीन फारुकी,मोहम्मद सोहेल मोहम्मद मकसूद,शेख अजीम शेख मोईन,अरबाज शेख यांच्यासह १२ जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ८ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणाचा तपास शहर पोलीस करत आहेत.
वादग्रस्त पोस्ट प्रकरणी गुन्हा दाखल...बाजार समिती मोंढ्यातील व्यापारी कैलास काबरा यांनी वादग्रस्त पोस्ट एपीएमसी ग्रुपवर व्हायरल करत दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य केले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात मोहम्मद हशम खान यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्णा कारखाना मार्गावर जाळपोळ...रविवार रोजी रात्री ११ वाजेदरम्यानात अज्ञातांनी पूर्णा कारखाना मार्गावर असलेल्या एका मंगलकार्यालयजवळ रस्त्यावर दगड टाकून टायर जाळले व रहादारीस अडथळा निर्माण केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.