आतापर्यंत ११ जण आले परदेशातून, इंग्लंडमधून कोणीही परतले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:39 IST2020-12-30T04:39:18+5:302020-12-30T04:39:18+5:30
हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाची खबरदारी मागील मार्च महिन्यापासून घेतली जात असून, आतापर्यंत जिल्ह्यात परदेशातून फक्त ११ जण आल्याची नोंद ...

आतापर्यंत ११ जण आले परदेशातून, इंग्लंडमधून कोणीही परतले नाही
हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाची खबरदारी मागील मार्च महिन्यापासून घेतली जात असून, आतापर्यंत जिल्ह्यात परदेशातून फक्त ११ जण आल्याची नोंद आहे. सुदैवाने यातील कोणीही बाधित आढळले नाही. ज्यांची माहिती प्रशासनाकडे प्राप्त झाली अथवा ज्यांनी स्वत:हून नोंदणी केली असेच हे लोक असून, इतरांनी मात्र परस्परच होम क्वारंटाइन राहून काळ काढल्याने भविष्यात प्रशासनाला सतर्क राहावे लागणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीपासूनच काळजी घेतली जात होती. त्यातच परदेशातून अथवा परराज्यातून आलेल्यांवर प्रशासनाचे लक्ष होते. मात्र परदेशातून आलेल्या केवळ ११ जणांचीच मार्चपासून आजपर्यंत नोंद झाली आहे. यातील काही जणांची नावे प्रशासनाला वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झाली होती. तर काही जणांनी परदेशातून आल्यानंतर स्वत: नोंद करून घेतली होती. यात दुबई १, फिलिपाईन्स ३, जर्मनी १, साैदी अरेबिया १, ऑस्ट्रेलिया २, कझाकिस्तान १ तर मालदीववरून आलेल्या दाेघांचा यात समावेश होता. यापैकी कुणीही बाधित आढळले नव्हते.
इंग्लंडमधून कोणीही आले नाही
जिल्ह्यात सध्या इंग्लंड अथवा इतर देशांतूनही कोणी आले नाही. सध्या कोरोना विषाणूने आपल्या रुपासह तीव्रतेतही बदल केल्याच्या बातम्या येत असल्याने विदेशातून येणाऱ्यांबाबत धास्ती बसली आहे. मात्र विमानाची उड्डाणेच रद्द झाली असून यापूर्वीही कुणी आल्याची नोंद नसल्याने हिंगोलीकरांना यापासून तेवढा धोका नाही.
विदेशातून येणाऱ्यांची तपासणी कशी होते?
जिल्ह्यात विदेशातून आलेल्यांबाबत वरिष्ठ प्रशासनाकडूनच यादीसह माहिती अनेक जिल्ह्यांना मिळाली आहे. हिंगोलीत मात्र कोणी आले नसल्याने यादीही आली नाही. जर असा कोणी आला तर त्याचा नियमितपणे स्वॅब घेऊन कोरोनाची चाचणी तर होणारच आहे. याशिवाय पुणे येथेही पाठवून इतर विषाणू व विषाणूच्या स्वरूपाची माहिती घेतली जाणार आहे.