दुपारी तीनच्या सुमारास काेमल सरोदे ही महिला हंबरडा फोडत स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर आली. साहेब माझा ५ वर्षाचा मुलगा साहिल ऊर्फ चिकु संतोष सरोदे (रा. साटंबा, ह.मु. मस्तानशहा नगर, हिंगोली) हा आताच जंक्शन रेडीमेड दुकानापासून हरवला आहे. तो मला मिळून द्या असे म्हणून मोठ्याने रडत होती. तेवढ्यात पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी हातातले काम बाजूला सारुन तिची समजूत काढून पोलीस उपनिरीक्षक एस. एस. घेवारे यांना सदर प्रकरणाचा तात्काळ छडा लावण्याचे आदेश दिले. त्यावरुन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. सदरच्या मुलाचे फोटो व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवून तसेच पोलीस ठाणे हिंगोली शहर येथील पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, पोलीस अंमलदार असे खासगी लोकांना सदर मुलाचे फोटो दाखवून सदर मुलाचा शोध घेतला असता काही वेळातच तो गोदावरी कॉर्नर येथे रडत उभा असलेला मिळून आला. त्याला तात्काळ मातेच्या हवाली केले. यामुळे हंबरडा फोडून रडणाऱ्या मातेच्या चेहऱ्यावर क्षणात हसू फुलले. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोलीस निरीक्षक यू.ए. खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, पोउपनि किशोर पोटे, कुडमेते, शेख शकील, राजूसिंग ठाकूर यांच्या पथकाने केली.
हंबरडा फोडत रस्त्याने धावणाऱ्या मातेच्या चेहऱ्यावर क्षणात फुलले हसू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:38 IST