दुकाने तेवढी बंद, शहरभर फिरताहेत दुचाकीस्वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:30 IST2021-03-31T04:30:00+5:302021-03-31T04:30:00+5:30
हिंगोली जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत टाळेबंदीसह संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता प्रशासनाने हा उपाय केला ...

दुकाने तेवढी बंद, शहरभर फिरताहेत दुचाकीस्वार
हिंगोली जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत टाळेबंदीसह संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता प्रशासनाने हा उपाय केला असला तरीही नागरिकांना मात्र त्याचे काहीच गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर दुचाकीस्वारांची तेवढीच गर्दी पहायला मिळत आहे. पोलीस प्रशासनाने इंदिरा गांधी चौक ते महात्मा गांधी चौक असा मुख्य बाजारपेठेचा भाग तेवढा कडक संचारबंदीत आणला आहे. इतरत्र मात्र संचारबंदी नसल्यासारखेच वातावरण आहे. काही ठिकाणी पोलिसांनी सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याशी वाद घालणारेही अनेकजण दिसून येत होते. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता निदान दोन दिवस तरी नागरिकच कडक संचारबंदी पाळतील, असे वाटत होते. मात्र, त्याला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे दुकाने बंद असल्याचे वरकरणी दिसत असले तरीही घरपोच सर्वच सुविधा मिळत आहेत. एकप्रकारे त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविता येत असल्याने त्यावर कुणी आक्षेप घेण्याचे कारणही नाही. तरीही बाजारपेठेच्या रस्त्यांसह इतर रस्त्यांवर दुचाकीस्वारांची होणारी गर्दी नेमकी कशासाठी? हा प्रश्न आहे.
काहीजण तर पोलिसांनी विचारपूस करायला अडविले तरीही थांबायला तयार नाहीत. विचारपूस न करताच प्रसाद दिला तर तोही वादाचा विषय बनतो. आजही असे काही किरकोळ प्रकार घडले. मात्र, विनाकारण रस्त्याने फिरणाऱ्यांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही कर्तव्यावर जाताना त्रास सोसण्याची वेळ आली आहे.