Shock to power consumers | वीज ग्राहकांना बसणार शॉक

वीज ग्राहकांना बसणार शॉक

हिंगाेली : जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी असून आता वीज वितरण कंपनीने वसुली मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील तब्बल १ लाख ५५ हजार २२५ ग्राहक वीज कंपनीच्या रडारवर आहेत. त्यामुळे वीजबिलमाफीच्या आशेने बसलेल्या ग्राहकांना मोठा शॉक बसणार आहे.

जिल्हाभरात औंढा नागनाथ, वसमत, हिंगोली, कळमनुरी, सेनगाव अशा पाच उपविभागांत तब्बल २ लाख ३० हजार ४८० वीज ग्राहक आहेत. त्यापैकी १ लाख ५५ हजार २२५ वीज ग्राहकांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाने डोके वर काढले आहे. जवळपास आठ महिने कोरोनाने थैमान घातले आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद होते. आता कुठे व्यवहार सुरळीत होत असले तरी मागील सहा महिन्यांत झालेले नुकसान अद्याप भरून निघाले नाही. त्यात वीज वितरण कंपनीने थकबाकीदार वीज ग्राहकांकडून वीजबिल वसुली मोहीम हाती घेतली आहे. काही नेत्यांनी कोरोनाकाळातील वीजबिल माफ करणार असल्याची घोषणाही केली होती. त्यामुळे अनेक वीज ग्राहक बिलमाफीच्या प्रतीक्षेत होते. अनेक ग्राहकांनी वीजबिलाचा भरणा करण्याचे थांबविले होेते. त्यामुळे डिसेंबर २०२० अखेर थकबाकीचा आकडा १२ हजार ४५४.३४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच जिल्ह्यातील कायमस्वरूपी थकबाकीदार ग्राहकांची संख्याही जवळपास ६५ हजार ३६८ झाली आहे. या ग्राहकांकडे ९ हजार ६४०.६० कोटी रुपयांची थकबाकी आहे. आता वीज कंपनीने वीजबिल वसुली मोहीम हाती घेतल्याने थकबाकीदार ग्राहकांचे धाबे दणाणले आहे.

सर्वाधिक ग्राहक हिंगोली तालुक्यात

हिंगोली तालुक्यात सर्वात थकबाकीदार ग्राहक असून त्याचा आकडा ४२ हजार २०३ आहे. त्यानंतर वसमत ३७ हजार २१२, कळमनुरी ३० हजार ७१५, सेनगाव २४ हजार १५७ असून औंढा तालुक्यात २० हजार ९३८ थकबाकीदार ग्राहक आहेत.

असे आहेत थकबाकीदार ग्राहक

ग्राहकाचा प्रकार थकबाकीदार ग्राहक थकीत रक्कम (कोटीमध्ये)

घरगुती १४४३४५ ४६७८.८१

व्यावसायिक ६३५० ४३७.४०

वाणिज्य १९०९ ६६०.७३

इतर ८७० १३७.९९

लघुउद्योजक (पाॅवरलूम) १२६ १४.६३

पाणीपुरवठा ५४५ १७७१.२२

पथदिवे १०८० १०६८३.०६

एकूण १५५२२५ १२४५४.३४

थकबाकी भरून सहकार्य करावे

वीज विकत घेऊन ग्राहकांना वीजपुरवठा करावा लागतो. जिल्ह्यातील थकबाकीदार वीज ग्राहकांनी आपल्याकडील बिलाची थकबाकी भरून वीज कंपनीला सहकार्य करावे. थकबाकीदार ग्राहकांकडून वीजबिल वसुली करण्यासाठी पथके नियुक्त केली आहेत.

- एस.बी. जाधव,

मुख्य कार्यकारी अभियंता. हिंगोली

Web Title: Shock to power consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.