पोलीस मित्रच निघाला सिरीयल किलर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:28 IST2021-04-13T04:28:21+5:302021-04-13T04:28:21+5:30
सेनगाव तालुक्यातील साखरा येथील भारजाबाई मारोती इंगळे (वय ८२) या वृद्ध महिलेचा खून करून अंगावरील सोने-चांदीचे दागिने लुटत मृतदेह ...

पोलीस मित्रच निघाला सिरीयल किलर
सेनगाव तालुक्यातील साखरा येथील भारजाबाई मारोती इंगळे (वय ८२) या वृद्ध महिलेचा खून करून अंगावरील सोने-चांदीचे दागिने लुटत मृतदेह जवळच असलेल्या माळरानावर अर्धवट पुरलेल्या स्थितीत आढळून आला होता. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. साखरा गावात यापूर्वीही एका वृद्ध महिलेचा खून करून तिच्या अंगावरील सोने-चांदीचे दागिने लुटल्याची घटना घडली होती. त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे होते. पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी तत्काळ स्थागुशाचे पो. नि. उदय खंडेराय यांना तपासासाठी पथक स्थापन्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोउपनि शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वाखाली तपासासाठी पथक रवाना केले होते. या पथकाने सर्वच दिशांनी तपास सुरू केला. त्यानुसार साखरा येथीलच दिलीप अंबादास लाटे (वय ३२) हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यास विचारपूस केली असता भारजाबाई इंगळे यांच्या अंगावरील सोने लुटून पैशांसाठी खून केल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता यापूर्वी मनकर्णाबाई तुळशीराम सरूळे यांचाही खून केल्याची कबुली दिली.
योजनांची माहिती देण्याचा करत होता बहाणा
गावात एकट्या राहणाऱ्या वृद्ध महिलेला हेरून त्यांना शासकीय योजनांची माहिती देण्याचा बहाणा करून दिलीप अंबादास लाटे हा वृद्ध महिलेच्या घरात घुसत होता. तसेच तो तहसील कार्यालय व पोलिसांच्या अवती-भोवती फिरत होता. त्यामुळे कोणालाच त्याच्यावर संशय येत नव्हता. यातूनच दिलीप लाटे याने ९ एप्रिल रोजी भारजाबाई मारोती इंगळे यांच्या घरात घुसून त्यांना झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड घालून खून केला होता. यापूर्वीही मनकर्णाबाई तुळशीराम सरुळे या वृद्ध महिलेच्या घरात घुसून त्यांच्याही डोक्यात दगड घालून त्यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.