धावत्या वाहनातील गौण खनिज ठरतेय धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:26 IST2021-02-08T04:26:18+5:302021-02-08T04:26:18+5:30
कालबाह्य वाहने रस्त्यावर हिंगोली : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जुन्या वाहनांची स्थिती लक्षात घेऊन अशा वाहनांना चालविण्यासाठी परवाना देतात. मात्र, ...

धावत्या वाहनातील गौण खनिज ठरतेय धोकादायक
कालबाह्य वाहने रस्त्यावर
हिंगोली : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जुन्या वाहनांची स्थिती लक्षात घेऊन अशा वाहनांना चालविण्यासाठी परवाना देतात. मात्र, जिल्ह्यात अनेक कालबाह्य झालेली वाहने रस्त्यावरून धावताना दिसत आहेत. यात दुचाकीची संख्या अधिक दिसून येत आहे. रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट असल्याने रस्त्यावरील खड्ड्यात वाहने आदळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कालबाह्य झालेल्या वाहनांचा शोध घेऊन चालविण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी होत आहे.
कापसाच्या झाल्या पऱ्हाट्या
हिंगोली : जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कापसाची लागवड केली होती. आता जवळपास कापूस वेचणी संपत आली आहे. तसेच लाल्या रोगाने कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आता कापूस उपटून टाकत आहेत. आणखी दोन ते तीन महिन्यात येणारे पीक घेण्याच्या तयारीत शेतकरी असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे मजुरांच्या सहाय्याने कापूस उपटून टाकत असल्याचे चित्र आहे.
तुषार सिंचनला शेतकऱ्यांचे प्राधान्य
हिंगोली : जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे तलाव, विहिरींना मुबलक पाणी असल्याचे शेतकरी सांगत आहेत. आता शेतकरी पिकांना पाणी देताना दिसत आहेत. तसेच उपलब्ध पाण्याचा योग्य वापर व्हावा, तसेच वर्षातून किमान दोन पिके घेता यावीत, यासाठी शेतकरी तुषार सिंचन पद्धतीला प्राधान्य देत आहेत. यातून पाण्याची बचत करण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.
येहळेगाव तु. मार्गे हदगाव बस सुरू करा
हिंंगोली : हिंगोली येथून हदगाव जाण्यासाठी थेट एकही बस उपलब्ध नाही. हिंगोली येथून येहळेगाव तु. येथील देवस्थानाच्या दर्शनासाठी शेकडो भाविक जातात. मात्र, थेट बस उपलब्ध नसल्याने त्यांना कामठा फाटा येथे उतरून दुसऱ्या वाहनाने जावे लागत आहे. यात भाविकांचा वेळ जात आहे. तसेच हदगाव येथे जाण्यासाठी एकही बस नाही. त्यामुळे हिंगोली आगारातून हदगाव येथे जाण्यासाठी एस. टी. बस सुरू करावी, अशी मागणी भाविकांतून होत आहे.
फांद्या ठरताहेत धोकादायक
कळमनुरी : कळमनुरी तालुक्यातील आराटी फाटा ते घोळवा या मार्गाच्या दुतर्फा बाजूंनी अनेक ठिकाणी काटेरी झुडपे वाढली असून फांद्या रस्त्यालगत येत आहेत. यामुळे मोठ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन या मार्गावर आलेल्या काटेरी फांद्या तोडून रस्ता सुरक्षित करून द्यावा, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.
रस्त्यालगत कचऱ्याचे ढिगारे
आखाडा बाळापूर : येथील कळमनुरी ते वारंगा फाटा या मार्गाकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूंनी कचऱ्याचे ढिगारे टाकले जात आहेत. यामुळे दुर्गंधी सुटत असून, याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कचऱ्यासाठी डंपिंग ग्राऊड तयार करावे, तसेच शहरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
गतिरोधक बसविण्याची मागणी
हिंगोली : शहरातील बसस्थानक परिसरातून वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच प्रवेशद्वारासमोरच वाहनांचा गराडा असतो. त्यात येथूनच विद्यार्थ्यांची ये-जा असते. भरधाव वाहने धावत असल्याने या ठिकाणी दोन्ही बाजूंनी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी प्रवासी व नागरिकांतून केली जात आहे.